IPL2021 : दिल्ली कॅपिटल्सनंतर विराट कोहलीच्या संघाला मोठा धक्का 

दैनिक गोमन्तक
रविवार, 4 एप्रिल 2021

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा सुरु होण्यास काही दिवसांचा अवधी बाकी आहे. त्यामुळे सर्वच संघातील खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा सुरु होण्यास काही दिवसांचा अवधी बाकी आहे. त्यामुळे सर्वच संघातील खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. अशावेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या मागील हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोरोना पॉझिटिव्ह सापडला असल्याची माहिती मिळाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा सलामीवीर देवदत्त पद्दीकलची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघातील अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलचा कोरोना अहवाल सकारत्मक आढळला होता. 

यंदाच्या आयपीएल स्पर्धेचा चौदावा हंगाम 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या मोसमात गतवर्षीचा विजेता मुंबई इंडियन्स संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ पहिल्या सामन्यात मैदानावर उतरणार आहे. परंतु पहिल्या सामन्यापूर्वीच विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला मोठा झटका लागला आहे. अव्वल फॉर्ममध्ये असणारा फलंदाज सलामीवीर देवदत्त पद्दीकलला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे स्पर्धा सुरु होण्यासाठी काही दिवसच शिल्लक असताना अशा परिस्थितीत देवदत्त पद्दीकलला कोरोनाला संसर्ग होणे ही संघासाठी चिंताजनक बातमी आहे.  

IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सनंतर आता धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का     

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने संघाने अजूनपर्यंत एकदाही आयपीएल स्पर्धेचा खिताब पटकावलेला नाही. परंतु, या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ एक प्रमुख दावेदार म्हणून मैदानावर उतरताना दिसणार आहे. त्याचवेळेस देवदत्त पद्दीकलचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याबद्दल संघ व्यवस्थापनाने कोणतीच अधिकृत माहिती आतापर्यंत दिलेली नाही. मात्र, जर अहवालाचा विचार केला गेला तर देवदत्त पद्दीकल सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळणे कठीण आहे.    

गेल्या वर्षी आरसीबीसाठी डावाची सुरवात करणाऱ्या देवदत्तने धमाकेदार कामगिरी केली होती. त्याने 15 सामन्यात 5 अर्धशतकांसह एकूण 473 धावा केल्या होत्या. युएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या तेराव्या सत्रात, धावा करण्याच्या बाबतीत देवदत्त संघात पहिल्या स्थानावर होता. तर, कर्णधार विराट कोहलीने 15 सामने खेळताना 466 धावा केल्या होत्या. याशिवाय, देवदत्तने यावर्षीच्या स्थानिक स्पर्धेत देखील चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले होते. सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेन्टी स्पर्धेत 6 सामने खेळताना देवदत्तने 218 धावा केल्या होत्या. त्यानंतर विजय हजारे एकदिवसीय करंडक स्पर्धेत त्याने 7 सामन्यांत 737 धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने सलग चार सामन्यात शतक झळकावून विशेष कामगिरी देखील केली होती.  

 

संबंधित बातम्या