गावागावांतील मेस्सी अन्‌ रोनाल्डो भिडणार!
Football

गावागावांतील मेस्सी अन्‌ रोनाल्डो भिडणार!

कोल्हापूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही आता फुटबॉल चांगलाच रुजला आहे. त्या-त्या गावात अनेक ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लियोलेन मेस्सीही तयार झाले आहेत. रोनाल्डो आणि मेस्सीबरोबरच आता नेमारप्रेमी फुटबॉलपटूंची संख्याही वाढली आहे. कोरोना महामारीनंतर ग्रामीण फुटबॉल हंगामाला हळूहळू प्रारंभ झाला असून कुडित्रे (ता. करवीर) येथे होणाऱ्या खुल्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या निमित्ताने त्यांच्या उत्साहाला खऱ्या अर्थाने उधाण येणार आहे.

दरम्यान, या स्पर्धेच्या निमित्ताने शहरातील संघही गावाकडच्या मैदानावर आपली जिगर पणाला लावणार आहेत. डी. सी. नरके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन सांगरूळ फुटबॉल क्‍लबने केले असून, १४ फेब्रुवारीपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. एकूणच जिल्ह्याचा विचार केला, तर केवळ फुटबॉलच्या प्रेमाखातर गावगाड्यातील पोरांची धडपड सुरू आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते रिक्षा व्यावसायिक, नोकरदार, सेंट्रिंग-फरशी काम करणाऱ्या पोरांचा त्यात समावेश आहे. सुसज्ज मैदान नसले तरी ते इमाने-इतबारे ते रोज न चुकता सराव करतात. अगदी फ्लड लाईट लावून डे-नाईट सामन्यांचे आयोजनही अनेक ठिकाणी केले जाते.

लॉकडाउननंतर यंदाच्या हंगामात नंदगाव, मुरगूड, निगवे, वडणगे, शिरोली आदी ठिकाणी सेव्हन अ साईड, नाईन अ साईड अशा ग्रामीण फुटबॉल स्पर्धा झाल्या; पण कुडित्रेतील स्पर्धेच्या निमित्ताने आता पहिल्यांदाच ग्रामीण आणि शहरी फुटबॉलचा थरार एकाच मैदानावर अनुभवता येणार आहे.

करिअर म्हणून फुटबॉलकडे
केवळ आवड म्हणून नव्हे, तर करिअर म्हणूनही आता ग्रामीण भागातील खेळाडू फुटबॉलकडे आकर्षित होऊ लागले आहेत. या खेळात विविध जागतिक रेकॉर्डही ही मंडळी नोंदवू लागली आहेत. ग्रामीण फुटबॉल स्पर्धांत खेळणाऱ्या वडणगे क्‍लबच्या प्रणव भोपळे याने लॉकडाउनच्या काळात नाक आणि कपाळावर फुटबॉल बॅलन्स करण्याचा विक्रम प्रस्थापित केला.

एक नजर ग्रामीण फुटबॉल
*एकूण ग्रामीण संघ -६५
*स्पर्धांतून ऍक्‍टिव्ह संघ -३२
*करवीर तालुक्‍यातील संघ- २०

ग्रामीण भागातील खेळाडूंत प्रचंड टॅलेंट आहे. ते शहरातील खेळाडू आणि संघासमोर यावे. त्याचवेळी शहरातील खेळाडूंचा खेळ ग्रामीण भागातील खेळाडूंना पहाता यावा, अशा दुहेरी उद्देशातून यंदा ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही संघांना स्पर्धेसाठी निमंत्रित केले आहे. या दोन्ही गटातून येणाऱ्या संघात अंतिम फेरीचा थरारही अनुभवायला मिळणार आहे.- संभाजी नाळे, सांगरूळ फुटबॉल क्‍लब

Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com