ग्रामीण फुटबॉल गुणवत्तेस प्रोत्साहन : ब्रह्मानंद

Dainik Gomantak
शुक्रवार, 12 जून 2020

जीएफडीसीच्या माध्यमातून पायाभूत विकास अधिक व्यापक करण्याचे लक्ष्य

पणजी

गोवा फुटबॉल विकास मंडळाचा (जीएफडीसी) अध्यक्ष या नात्याने राज्यातील ग्रामीण फुटबॉल गुणवत्तेस प्रोत्साहन देण्यावर आपला भर राहीलअसे गोव्याने महान फुटबॉलपटू ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी सांगितले. राज्य सरकारने त्यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

‘‘राज्याच्या ग्रामीण भागात फुटबॉलची गुणवत्ता भरपूर आहेत्यास सक्षम व्यासपीठ आवश्यक आहे. जीएफडीसीच्या माध्यमातून हे काम होईल. पूर्वी मंडळ समिती सदस्य या नात्याने ग्रामीण फुटबॉल विकास योजनेत मी मौलिक सूचना केलेल्या आहेत. आता अध्यक्ष या नात्याने जबाबदारीत वाढ झाली आहे. पायाभूत फुटबॉल विकास आणखीनच व्यापक करण्याचे लक्ष्य राहील,’’ असे ६६ वर्षीय माजी आंतरराष्ट्रीय गोलरक्षक ब्रह्मानंद यांनी सांगितले. ते भारताचे माजी फुटबॉल कर्णधार असून गोव्याचे पहिले अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडू आहेत.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जुलै २०१२ मध्ये डॉ. रुफिन मोंतेरो यांच्या अध्यक्षतेखाली जीएफडीसीची मुहूर्तमेढ रोवली. राज्यातील पायाभूत पातळीवरील फुटबॉलला खतपाणी घालणे हा या मंडळाचा मुख्य उद्देश आहे. मंडळाचे कार्य विस्तारत असतानाडॉ. मोंतेरो यांनी वैयक्तिक कारणास्तव नोव्हेंबर २०१८ मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिलातेव्हापासून हे पद रिक्त होते. जीएफडीसीच्या सुरवातीपासून मंडळ समितीचे सदस्य राहिलेले ब्रह्मानंद यांची आता या महत्त्वाच्या पदावर वर्णी लागली आहे.

जीएफडीसीची राज्यातील विविध भागात मिळून एकूण ३९ प्रशिक्षण केंद्रे आहेतत्यामुळे हजारो युवा फुटबॉलपटूंना ग्रासरूट मार्गदर्शन लाभते. शिवाय ३० प्रशिक्षणार्थींची निवासी फुटबॉल अकादमी मडगाव येथे कार्यरत आहे. राज्य सरकारकडून जीएफडीसीला वार्षिक ५ कोटी रुपये अनुदान मिळते. जीएफडीसीच्या प्रत्येक केंद्रात प्रशिक्षक वर्ग सक्रिय असून १० व १३ वर्षांखालील मुला-मुलींच्या वयोगटापासून प्रशिक्षण दिले जाते.

 सकस आहार गरजेचा

‘‘सकारात्मक विचारधारणेतून काम केल्यास योग्य फळ नक्कीच मिळते. सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर करताना युवा खेळाडूंच्या सकस आहाराकडे लक्ष पुरविले जाईल. मैदानात मेहनत घेणाऱ्या युवा पायांना विश्रांती देताना समतोल आहारही तेवढाच महत्त्वाचा आहे,’’ असे गोव्याचे पहिले संतोष करंडक विजेते कर्णधार म्हणाले. निवृत्तीनंतर ब्रह्मानंद यांनी सेझा फुटबॉल अकादमीत गोलरक्षक प्रशिक्षकमार्गदर्शकप्रशासकमेंटॉर आदी विविध भूमिका यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. तो अनुभव जीएफडीसीचे अध्यक्ष या नात्याने काम करताना उपयोगी ठरेलअसे त्यांनी नमूद केले.

 गुणवत्तेची पाठराखण

ब्रह्मानंद यांनी सांगितलेकी ‘‘जीएफडीसीच्या प्रशिक्षण व्यवस्थेचा दर्जा राखण्यावर भर राहील. प्रशिक्षण केंद्रात पुष्कळ मुलं येतात. त्यापैकी काही मोजके सर्वोत्तम ठरतील. त्यांना योग्य मार्गदर्शन पुरविण्यासाठी तत्परता असेल. जीएफडीसीच्या प्रशिक्षणार्थींनी देशाचे प्रतिनिधित्व करणे हे अभिमानास्पद असेल. भारतीय मुलींच्या संभाव्य संघात जीएफडीसीच्या प्रशिक्षणार्थी आहेतशिवाय जीएफडीसीच्या मुलांनीही देशाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले आहे. हाच दर्जा कायम ठेवण्याकडे कटाक्ष राहील. मैदानावर येणाऱ्या बहुतेक मुलांचे पालक गरीब पार्श्वभूमीचे असतात. अशावेळी गुणवत्ता दुर्लक्षित राहण्याची किंवा अकाली खुंटण्याची भीती असते. अशा खेळाडूंना आधार देण्याकडे कटाक्ष असेल. त्यांना योग्य मार्गदर्शन करताना व्यावसायिक क्लबकडून संधी मिळवून देण्याचा प्रयत्न राहील.’’

ब्रह्मानंद शंखवाळकर यांच्याविषयी...

- भारतातील सर्वोत्तम फुटबॉल गोलरक्षकांपैकी एक

- १९९७ सालचा अर्जुन पुरस्कारगोव्याचे पहिले क्रीडापटू

- अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे दशकातील (१९८५-१९९५) सर्वोत्तम फुटबॉलपटू

- दोन वेळा (१९८२-८३ व १९८३-८४) संतोष करंडक विजेत्या गोव्याचे कर्णधार

- भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार

- गोव्यात पानवेल स्पोर्टस क्लबसाळगावकरचर्चिल ब्रदर्सअँडरसन मरिन संघाचे प्रतिनिधित्व

- १९९५ साली स्पर्धात्मक फुटबॉलमधून निवृत्ती

- १९९७ ते २००५ या कालावधीत भारतीय फुटबॉल संघाचे गोलरक्षक प्रशिक्षक

- २०१४ साली गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सेवेतून प्रशिक्षण संचालक या नात्याने निवृत्त

- सेझा फुटबॉल अकादमीत विविध पदांवर काम

संबंधित बातम्या