सचिनने केली अजिंक्य रहाणेची पाठराखण

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताचे नेतृत्व करणारा अजिंक्‍य रहाणे शांत आणि संयमी आहे याचा अर्थ तो आक्रमक नाही असा समज करू नये, असे मत क्रिकेट विक्रमवीर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली :  विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताचे नेतृत्व करणारा अजिंक्‍य रहाणे शांत आणि संयमी आहे याचा अर्थ तो आक्रमक नाही असा समज करू नये, असे मत क्रिकेट विक्रमवीर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांत रहाणे भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. कसोटी सामन्यात रहाणेने दोनदा भारतीय संघाचे नेतृत्व केलेले आहे आणि ते दोन्ही सामने भारताने जिंकलेले आहेत. २०१७ मधील ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात मालिका बरोबरीत असताना धरमशाला येथे झालेला अंतिम सामना भारताने रहाणेच्या नेतृत्वाखाली जिंकला होता आणि मालिकाही जिंकली होती.

रहाणेच्या यशस्वी नेतृत्वाचा हाच दाखला देत सचिन म्हणतो, अजिंक्‍यने याअगोदरच कर्णधारपद भूषवलेले आहे. तो शांत असतो याचा अर्थ त्याच्यामध्ये आक्रमकता नाही असा होत नाही. आपल्यामघ्ये असलेली आक्रमकता दाखवण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा असतो. चेतेश्‍वर पुजारा हे दुसरे उदाहरण आहे. तोसुद्धा शांत असतो. त्याची देहबोलीही संयमी असते, पण त्याची खेळातील आक्रमकता इतरांएवढीच आहे. रहाणेची नेतृत्वाची शैली विराटपेक्षा वेगळी असेल, पण संघाला जिंकून देणे हे दोघांचेही ध्येय एकच आहे. आपापल्या निर्धारित ठिकाणी जाण्यासाठी प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असतात, पण ध्येय भारताला जिंकून देण्याचे असते, असे सचिनने सांगितले.

टीम इंडिया महत्त्वाची
1. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीचा संघाच्या समतोलपणावर परिणाम होऊ शकेल, पण त्याच वेळी इतरांना आपले कर्तृत्व दाखवण्याची संधीही मिळेल. शेवटी कोण एक खेळाडू नाही तर ही टीम इंडिया आहे. एखादा खेळाडू जखमी होऊन मालिकेच्या बाहेर जाऊ शकतो, परंतु संघ तेथेच असतो असे मत सचिनने मांडले.

2. ॲडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात अवघ्या ३६ धावांत भारतीय संघाचा खुर्दा उडाला होता. त्यामुळे येत्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजांवर अधिक दडपण असणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेला आघाडीवर राहून लढावे लागणार आहे. फलंदाज म्हणूनही अजिंक्‍यवर सचिनने विश्‍वास व्यक्त केला. 

 

पृथ्वी शॉच्या हालचाली संथ

पृथ्वी शॉच्या हालचाली संथ झाल्या आहेत. त्याचे पाय आणि बॅट चेंडू जवळून गेल्यांतर पुढे येतात, त्यामुळे बॅट आणि पॅडमध्ये मोठी पोकळी निर्माण होते. परिणामी तो त्रिफाळाचित होत आहे, अशा प्रकारे सचिनने शॉच्या तंत्रातले दोष सांगितले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पृथ्वी शॉ दोन्ही डावांत मिळून सहा चेंडूच खेळला आणि अवघ्या चारच धावा करू शकला.

संबंधित बातम्या