मास्टर ब्लास्टरने पहिल्यांदाच भारतीय संघात निवडलेल्या खेळाडूंचे केले अभिनंदन  

दैनिक गोमन्तक
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने भारतीय संघात प्रथमच निवड झालेल्या क्रिकेटपटूंचे अभिनंदन केले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने भारतीय संघात प्रथमच निवड झालेल्या क्रिकेटपटूंचे अभिनंदन केले आहे. सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि राहुल तेवतिया यांची इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पाच टी-ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेसाठी पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली. आणि त्यानंतर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावरील ट्विटरवरून सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि राहुल तेवतिया यांचे भारतीय संघात आगमन झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. 

ISL 2020-21: मुंबई सिटीस पराभवाचा जबर हादरा; बदली खेळाडूंच्या गोलमुळे...

सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि राहुल तेवतिया यांच्यासोबतच सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी-ट्वेन्टी मालिकेसाठी निवड झालेल्या मात्र दुखापतीच्या कारणामुळे मैदानात उतरू न शकलेल्या वरुण चक्रवर्तीचे देखील अभिनंदन केले आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी वरुण चक्रवर्तीची देखील भारतीय संघात निवड झालेली आहे. आणि यावेळेस तो तंदरुस्त असल्यामुळे मैदानात उतरण्याची देखील शक्यता आहे. सचिन तेंडुलकरने ट्विट करताना, ईशान किशन, राहुल तेवतिया आणि सूर्यकुमार यादव यांच्यासह ऑस्ट्रेलियामध्ये मैदानात उतरू न शकलेल्या वरुण चक्रवर्तीचे अभिनंदन, असे म्हटले आहे. याशिवाय भारताकडून खेळणे हे कोणत्याही क्रिकेटपटूसाठी सर्वात मोठा सन्मान असल्याचे सचिनने आपल्या ट्विट मध्ये पुढे लिहिले आहे. तसेच पहिल्यांदाच टीम इंडियात निवड झालेल्या सर्वांना खूप यश मिळावे असे म्हणत, सचिनने या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. 

इंग्लंड विरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या टी-ट्वेन्टी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली. मुंबई इंडियन्सचा यष्टीरक्षक ईशान किशनला या संघात संधी मिळाली आहे, तर स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवलाही संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय अष्टपैलू राहुल तेवतियाचीही टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. त्यानंतर, रिषभ पंतने कसोटी सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याने टी-ट्वेन्टी संघातही तो परतला आहे.     

दरम्यान, ईशान किशनने इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) तेराव्या आवृत्तीत 14 सामन्यांमध्ये 516 धावा केल्या होत्या. यावेळेस त्याने चार अर्धशतक लगावले होते. तर सूर्यकुमार यादवने 16 सामन्यांमध्ये मैदानात उतरताना 480 धावा केल्या होत्या. त्याचवेळेस राहुल तेवतियाने 255 धावा केल्या होत्या. आणि 14 सामन्यांमध्ये त्याने गोलंदाजी करताना 10 बळी टिपले होते.     

संबंधित बातम्या