अर्जुन तेंडुलकर आयपीलच्या 14 व्या हंगामात खेळणार ? 

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 28 जानेवारी 2021

अर्जुन तेंडुलकर आगामी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या 14 व्या हंगामात मैदानावर उतरू शकतो.

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रमांचा टप्पा गाठत इतिहास रचला आहे. सचिन तेंडुलकरने केलेल्या विक्रमांच्या जवळ आजही कोणताही खेळाडू पोहचू शकलेला नाही. मात्र सचिनच्या या कामगिरीमुळे त्याचे हे वलय सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या भोवती देखील निर्माण झाले आहे. अर्जुन तेंडुलकर मागील काही वर्षांपासून क्रिकेट खेळत असल्याचे सर्वांनाच माहित आहे. तसेच डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज असलेला अर्जुन आंतरराज्य सामने खेळत असतानाच, अनेक वेळा भारतीय क्रिकेट संघाबरोबर सराव करताना अनेकदा पाहायला मिळाले आहे. त्यानंतर आता अर्जुन तेंडुलकर आगामी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या 14 व्या हंगामात मैदानावर उतरू शकतो.  

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट मध्ये आपले नाव कमावण्यासाठी धडपड करत आहे. याशिवाय वेळोवेळी तो आयपीएल मधील मुंबई इंडियन्सच्या संघाला नेट मध्ये गोलंदाजी करताना दिसला होता. त्यानंतर यंदाच्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून अर्जुन तेंडुलकरने पदार्पण केले आहे. व त्यामुळे आता तो आयपीएलच्या लिलावात देखील पात्र ठरला आहे. यावर्षीच्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत पदार्पण करताना अर्जुनने दोन सामने खेळले आहेत. मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये अर्जुनची कामगिरी म्हणावी तशी चांगली झाली नसल्याचे पाहायला मिळाले. व याव्यतिरिक्त त्याच्या संघाला या दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. परंतु, अर्जुनने वरिष्ठ संघाकडून खेळण्यास सुरवात केल्याने आता तो आयपीएलच्या लिलावासाठी पात्र ठरला असून, यावेळच्या आयपीएल लिलावात अर्जुन तेंडुलकरवर बोली लावली जाऊ शकते.        

आघाडीपटू उत्तम राय पुन्हा धेंपो संघात

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 2021 मध्ये होणाऱ्या आयपीलच्या 14 व्या मोसमासाठी खेळाडूंची नावे लिलावात सहभागी करण्यासाठी काही नियम बनवले आहेत. आणि अर्जुन तेंडुलकरने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबई संघाकडून पदार्पण केल्यामुळे तो आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे त्याला आयपीएल स्पर्धेत मैदानावर उतरण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार असून, त्यानंतर राज्य क्रिकेट संघटनेने हिरवा कंदील दिल्यास अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या लिलावात दिसू शकेल.       

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने आयपीलच्या 14 व्या हंगामासाठीचा लिलाव पार पडणार असल्याची घोषणा केली होती. हा लिलाव 18 फेब्रुवारी रोजी चेन्नईत होणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली होती. शिवाय हा लिलाव मिनी असणार असल्याचे बीसीसीआयने म्हटले होते. तर पुढील वर्षी म्हणजे 2022 मध्ये होणाऱ्या आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठी मेगा लिलाव होणार असल्याचे मंडळाने सांगितले होते. 2022 मध्ये होणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी सर्व संघांची पुनर्रचना होणार असून, दोन अतिरिक्त संघ देखील मैदानात उतरणार आहेत.      

संबंधित बातम्या