पीटर वाझ यांच्या निधनाने `फुटबॉल`वर शोककळा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 डिसेंबर 2020

स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाचे मुख्य आश्रयदाते, क्रीडा प्रमोटर पीटर वाझ यांच्या अकाली निधनाबद्दल अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पणजी :  स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाचे मुख्य आश्रयदाते, क्रीडा प्रमोटर पीटर वाझ यांच्या अकाली निधनाबद्दल अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने तीव्र दुःख व्यक्त केले आहे. स्पोर्टिंग क्लब द गोवाचे संस्थापक असलेले पीटर 53 वर्षांचे होते. बांधकाम, पर्यटन, आदरातिथ्य व्यवसायातील मॉडेल्स ग्रुपचे ते प्रमुख होते. कोविड-19 मुळे बंगळूर येथे त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.पीटर वाझ यांचा स्पोर्टिंग क्लब द गोवा संघ द ऑरेंजस या टोपणनावाने भारतीय फुटबॉलमध्ये ओळखला जातो. या संघाच्या निर्मितीत, तसेच उभारणीत पीटर यांनी व्यक्तिशः लक्ष घालून भारतीय फुटबॉलच्या विकासात हातभार लावला.

 

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सचिव कुशल दास यांनी पीटर वाझ यांचे वर्णन फुटबॉलमधील `खूप सक्षम प्रशासक` असे केले आहे. त्यांची फुटबॉलप्रती उत्कटता अतुलनीय ठरली, असे दास यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे. स्पोर्टिंग क्लब द गोवाचे प्रमुख या नात्याने क्लब आणि भारतीय फुटबॉलमधील त्यांची गतिशीलता व योगदान दीर्घकाळ आठवणीत राहील, असे दास यांनी नमूद केले आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सर्व स्टाफतर्फे कुशल दास यांनी पीटर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

बॅडमिंटनमध्येही योगदान

गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव संदीप हेबळे यांनीही पीटर वाझ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी राज्यातील बॅडमिंटनमध्येही महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचा मॉडेल्स ईगल्स संघ राज्यस्तरीय प्रोफेशनल बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या वर्षी विजेता, तर नंतरच्या वर्षी उपविजेता ठरला, असे हेबळे यांनी नमूद केले.

 

दर्जेदार क्लबची निर्मिती

स्पोर्टिंग क्लब द गोवा संघ देशातील प्रमुख फुटबॉल क्लब गणला जातो. या क्लबच्या माध्यमातून पीटर यांनी गोव्यातील युवा फुटबॉलपटूंना मोठे व्यासपीठ मिळवून दिले. गोवा फुटबॉल संघटनेच्या लीग स्पर्धेत खेळणाऱ्या दोना पावला येथील सिदाद द गोवा स्पोर्टस क्लब विकत घेऊन त्यांनी 1999 साली स्पोर्टिंग क्लब द गोवाची स्थापना केली. हा संघ गोवा प्रो-लीग स्पर्धेतील पाच वेळचा (2006, 2013-14, 2015-16, 2017-18, 2019-20) विजेता आहे. स्पोर्टिंग क्लब आय-लीग स्पर्धेत एक वेळ (2004-05), तर फेडरेशन कपमध्ये तीन वेळा (2005, 2006, 2013-14) उपविजेता ठरला. सुपर कपमध्ये या संघाने 2005 साली विजेतेपद मिळविले. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची धोरणे न पटल्यामुळे 2016-17 मोसमात स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने गोव्यातील धेंपो क्लब व साळगावकर एफसी या संघांसमवेत आय-लीगमधून माघार घेतली. पीटर वाझ यांनी स्पोर्टिंग क्लबच्या माध्यमातून युवा फुटबॉल गुणवत्तेला खतपाणी घालण्यासाठी पणजीतील डॉन बॉस्को ओरेटरी येथे फुटबॉल अकादमीची निर्मिती केली. स्पोर्टिंग क्लबचे ज्युनियर संघ राज्य फुटबॉलमधील विविध वयोगट स्पर्धेत नियमितपणे खेळतात आणि विजेते ठरले आहेत. त्यांचा महिला संघही राज्यस्तरीय स्पर्धेत खेळतो.
 

संबंधित बातम्या