प्रोफेशनल लीग फुटबॉलमध्ये चर्चिल ब्रदर्सचा 5 - 0 फरकाने धुव्वा

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

आघाडीपटू स्टीफन फर्नांडिस याने नोंदविलेल्या शानदार हॅटट्रिकच्या बळावर साळगावकर एफसीने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत दणदणीत विजयाची नोंद केली.

पणजी : आघाडीपटू स्टीफन फर्नांडिस याने नोंदविलेल्या शानदार हॅटट्रिकच्या बळावर साळगावकर एफसीने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत दणदणीत विजयाची नोंद केली. सामन्याच्या उत्तरार्धात झालेल्या सर्व गोलच्या बळावर त्यांनी गतविजेत्या चर्चिल ब्रदर्सचा 5-0 फरकाने धुव्वा उडविला.

सामना मंगळवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. स्टीफनने अनुक्रमे 63, 76 व 79व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. याशिवाय स्टेफ्लॉन डिकॉस्ताने 84व्या, तर फेझर गोम्सने 88व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल नोंदविला.

आय-लीग : चर्चिल ब्रदर्स खडतर आव्हानासाठी सज्ज

साळगावकर एफसीचा हा सलग दुसरा विजय ठरला. त्यांचे आता सर्वाधिक सहा गुण झाले असून त्यांनी गुणतक्त्यात अग्रस्थान प्राप्त केले आहे. चर्चिल ब्रदर्सला लागोपाठ दुसरा पराभव पत्करावा लागला.

स्पर्धेत बुधवारी (ता. 3) धुळेर स्टेडियमवर स्पोर्टिंग क्लब द गोवा आणि वास्को स्पोर्टस क्लब यांच्यात सामना होईल. गतमोसमात संयुक्त विजेते असलेल्या स्पोर्टिंगचा हा स्पर्धेतील पहिलाच सामना आहे.
 

संबंधित बातम्या