सॅनसन खेळणार एफसी गोवाच्या जर्सीत

Dainik Gomantak
रविवार, 21 जून 2020

बावीस वर्षीय लेफ्ट बॅक खेळाडूचा दोन वर्षांचा करार

पणजी,

गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत साळगावकर एफसीकडून खेळताना बचावफळीत भक्कम खेळ केलेल्या सॅनसन परेरा याला एफसी गोवा संघाने करारबद्ध केले आहे. नुवे येथील या २२ वर्षीय लेफ्ट बॅक खेळाडूने दोन वर्षांच्या करारपत्रावर सही केली.

आयएसएल लीग विनर्स एफसी गोवा संघाचा सॅनसन पाठिराखा आहे. आता या संघातून खेळायला मिळतेय या भावनेने तो आनंदला आहे.‘‘खरोखरच उत्साहित झालो आहे. मी एफसी गोवाचा चाहता असून त्यांच्याकडून खेळण्याचे स्वप्न मी नेहमीच पाहिले. भावना मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही,’’ असे करारपत्रावर सही केल्यानंतर सॅनसनने नमूद केले. एफसी गोवा संघातून खेळताना विजेता ठरण्याचे लक्ष्य त्याने बाळगले आहे.

एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी सॅनसनचे संघात स्वागत केले आहे. साळगावकर संघातून खेळताना त्याने सातत्य राखले. खेळाडू या नात्याने तो मोठा दर्जा गाठू शकतो. चेंडूवर ताबा राखत विंगमधून सातत्याने धाव घेत मुसंडी मारण्याची त्याची क्षमता आहे,  असे रवी यांनी संघातील नव्या खेळाडूविषयी सांगितले. तो आमची शैली आत्मसात करेल आणि लेफ्ट बॅक जागेवर हक्क सांगण्यासाठी मेहनत घेईल,असा विश्वास रवी यांनी व्यक्त केला.

 

साळगावकर संघाकडून कारकीर्द

शालेय पातळीवर असताना सॅनसन परेरा साळगावकर एफसीच्या १४ वर्षांखालील संघात दाखल झाला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. या संघातर्फे त्याने जीएफएची १४ वर्षांखालील आणि १८ वर्षांखालील लीग स्पर्धा दोन वेळा जिंकली. २०१६-१७ मोसमात त्याने साळगावकर एफसीच्या सीनियर संघात पदार्पण केले. त्या मोसमात या संघाने प्रो-लीग स्पर्धा जिंकली, त्यात सॅनसनचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला. साळगावकर एफसीने २०१७-१८ मोसमात गोवा सेव्हन्स स्पर्धा, तर २०१८-१९ मोसमात आसाम गोल्ड कप जिंकला. संघाच्या या दोन्ही यशात सॅनसनने प्रमुख भूमिका निभावली.

संबंधित बातम्या