अखेर संजनाने घेतली जसप्रीत बुमराहची विकेट

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 15 मार्च 2021

जसप्रीत बुमराहने सोशल मीडियावरील ट्विटरवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

पणजी : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आणि मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी आजचा दिवस खास ठरला आहे. आपल्या आक्रमक गोलंदाजीमुळे क्रिकेट विश्वात शानदार प्रदर्शन करणाऱ्या जसप्रीत बुमराहने आज गोव्यामध्ये काही नातेवाईकांच्या उपस्थित संजना गणेशन हिच्यासोबत लग्न केले. आणि तो विवाहबंधनात अडकला आहे. गेल्या काही दिवसांपासून बुमराहच्या लग्नाची चर्चा सोशल मिडीयावर चांगलीच रंगली होती. व आज अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. 

जसप्रीत बुमराहने सोशल मीडियावरील ट्विटरवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. आणि यासोबतच त्याने कॅप्शन देताना, प्रेम हे जर तुम्हाला योग्य वाटले तर आपल्याला मार्ग दाखवते असे, लिहिले आहे. याशिवाय आपण एकत्र येत एक नवीन प्रवास सुरू करत असल्याचे जसप्रीत बुमराहने लिहिले असून, आजचा दिवस हा आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस असल्याचे त्याने नमूद केले आहे. तसेच आपल्या आयुष्यातील ही गोष्ट सांगायला आनंद होत असल्याचे म्हणत, त्याने या पोस्टच्या शेवटी जसप्रीत आणि संजना असे लिहिले आहे.

दरम्यान, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन ही एक सूत्रसंचालक आहे. व मागील वर्षी संयुक्त अरब अमिरातीत पार पडलेल्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या तेराव्या हंगामात समालोचन करताना दिसली होती.  
 

संबंधित बातम्या