शाळांना क्रिकेट साहित्य उपक्रम स्त्युत्य

Dainik Gomantak
शुक्रवार, 19 जून 2020

आमदार दयानंद सोपटे यांच्याकडून ‘जीसीए’चे कौतुक; पाठबळ देण्याचे आश्वासन

पेडणे 

गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) शालेय क्रिकेटपटूंना उत्तेजन देण्याच्या उद्देशाने क्रिकेट साहित्य पुरवत आहे, हा उपक्रम स्त्युत्य असल्याचे प्रतिपादन आमदार दयानंद सोपटे यांनी केले.

पेडणे तालुक्यातील काही चांगले क्रिकेटपटू नावारुपास येत असताना, नंतर ते मागे पडत गेले ही खंतही आमदार सोपटे यांनी व्यक्त केली. ते जीसीएतर्फे पेडणे तालुक्यातील १८ शाळांना क्रिकेट साहित्य प्रदान कार्यक्रमात बोलत होते. या उपक्रमातून चांगले क्रिकेटपटू गवसण्यास मदत होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपण क्रीडा स्पर्धांना नेहमीच प्रोत्साहन दिलेले आहे. पेडणे तालुक्यातील युवांना क्रीडा क्षेत्रातच नव्हे, तर इतर क्षेत्रातही पाठबळ देण्याचे आश्वासन आमदार सोपटे यांनी यावेळी दिले.

पेडणे येथील श्री भगवती विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमास जीसीएचे सचिव विपुल फडके, माजी अध्यक्ष विनोद (बाळू) फडके व सदस्य मोहन चोडणकर उपस्थित होते. जीसीएकडून२०१९-२० मोसमात घेतलेल्या शालेय पातळीवरील १४ आणि १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत खेळलेल्या शाळांना क्रिकेट साहित्य देण्यात आले. सिद्धेश हरमलकर, गणेश सावळ देसाई व मोगवीर वैद्य यांनी मान्यवरांचे स्वागत केले. गजानन शेट कोरगावकर यांनी सूत्रसंचालन केले. किशोर किनळेकर यांनी आभार मानले.

‘प्रशिक्षकाची भूमिका महत्त्वाची’

जीसीएचे माजी अध्यक्ष विनोद फडके यांनी सांगितले, की ‘‘आमचे गोव्याचे क्रिकेटपटू राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंइतकेच सक्षम आहेत. काही थोड्या फरकाने ते मागे पडतात, पण मेहनत घेऊन नक्कीच नावारुपास येतील.खेळाडू घडविण्यात प्रशिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. शाळा आणि संबंधित प्रशिक्षकांनी देण्यात आलेल्या या क्रिकेट साहित्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून चांगले क्रिकेटपटू घडवावेत.’’

क्रिकेट प्रशिक्षण केंद्रासाठी प्रयत्न : विपुल

प्राथमिक स्तरावर क्रिकेटपटू तयार व्हावेत यासाठी प्रशिक्षण केंद्राचे आवश्यकता आहे. पेडणे तालुक्यात क्रिकेट प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे विपुल फडके यांनी नमूद केले. राज्यातील प्रत्येक तालुक्यात जीसीएतर्फे क्रिकेट प्रशिक्षक केंद्र सुरू करण्यात येतील, अशी माहितीही विपुल यांनी दिली.

 

संबंधित बातम्या