गोव्यात इंडियन सुपर लीगचा दुसरा टप्पा 12 जानेवारीपासून

दैनिक गोमन्तक
शनिवार, 2 जानेवारी 2021

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेचा दुसरा टप्पा गोव्यातील तीन स्टेडियमवर 12 जानेवारीपासून खेळला जाईल.

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेचा दुसरा टप्पा गोव्यातील तीन स्टेडियमवर 12 जानेवारीपासून खेळला जाईल.

आशियाई फुटबॉल महासंघाची (एएफसी) चँपियन्स लीग स्पर्धा पुढे गेल्याने आयएसएल स्पर्धेच्या वेळापत्रकास धक्का लागलेला नाही. गतमोसमातील आयएसएल लीग विनर्स शिल्ड विजेता एफसी गोवा संघ चँपियन्स लीगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

आयएसएल स्पर्धेचा पहिला टप्पा 11 जानेवारीस संपेल, लगेच 12 जानेवारीपासून नॉर्थईस्ट युनायटेड व बंगळूर एफसी यांच्यातील लढतीने ५५ लढतींचा दुसरा टप्पा सुरू होईल. साखळी फेरीतील शेवटचा सामना 28 फेब्रुवारीस खेळला जाईल. तोपर्यंतचे वेळापत्रक आयएसएल स्पर्धेचे आयोजक फुटबॉल स्पोर्टस डेव्हपलमेंट लिमिटेडने (एफएसडीएल) रविवारी जाहीर केले. साखळी फेरीत एकूण 110 सामने होतील.

स्पर्धेतील चार प्ले-ऑफ लढती आणि अंतिम लढतीच्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील. 11 संघांच्या या स्पर्धेस 20 नोव्हेंबर रोजी सुरवात झाली. कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात खेळली जाणारी ही पहिली मोठी क्रीडा स्पर्धा ठरली. पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यातील सामनेही जैवसुरक्षा वातावरणात आणि बंद दरवाज्याआड फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, बांबोळी येथील जीएमसी स्टेडियम व वास्को येथील टिळक मैदान स्टेडियमवर खेळले जातील.

शेवटचा साखळी सामना 28 फेब्रुवारीस एटीके मोहन बागान व मुंबई सिटी एफसी यांच्यात होईल. स्पर्धेतील पहिले चार संघ डबल लेग प्ले-ऑफ फेरीसाठी पात्र ठरतील.

आणखी वाचा:

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्मा उपकर्णधार -

संबंधित बातम्या