स्वयंगोलमुळे स्पोर्टिंगचा विजय हुकला; पहिल्या बरोबरीमुळे सेझा अकादमीविरुद्ध एकच गुण

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 11 मार्च 2021

सातव्या मिनिटास मार्कुस मस्कारेन्हास याच्या गोलमुळे स्पोर्टिंग क्लबने आघाडी प्राप्त केला होती.

पणजी: सामना संपण्यास एक मिनिट बाकी असताना मायरन फर्नांडिस याने नोंदविलेला स्वयंगोल स्पोर्टिंग क्लब द गोवा संघासाठी खूपच नुकसानकारक ठरला, त्यामुळे गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत त्यांना सेझा फुटबॉल अकादमीविरुद्ध 1-1 गोलबरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले. सामना गुरुवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. गतवेळच्या संयुक्त विजेता स्पोर्टिंग क्लब 89व्या मिनिटापर्यंत एका गोलने आघाडीवर होता. सातव्या मिनिटास मार्कुस मस्कारेन्हास याच्या गोलमुळे स्पोर्टिंग क्लबने आघाडी प्राप्त केला होती, पण स्वयंगोलमुळे त्यांना विजयावर पाणी सोडावे लागले.

स्पर्धेत सलग चार सामने जिंकलेल्या स्पोर्टिंगची ही स्पर्धेतील पहिलीच बरोबरी ठरली. त्यांचे 13 गुण झाले आहेत. सेझा अकादमीची ही स्पर्धेतील दुसरी बरोबरी ठरली, त्यामुळे त्यांचे दोन गुण झाले आहेत. रोहित टोटाड याच्या क्रॉस पासवर स्पोर्टिंगच्या फिलीप ओडोग्वू याला गोल करण्याची संधी होती, पण त्याचा नेम कमजोर ठरला, पण वेळीच चेंडूवर ताबा राखत मार्कुसने स्पोर्टिंगला आघाडी मिळवून दिली. चार मिनिटानंतर सेझा अकादमीस बरोबरीची संधी होती, परंतु रिझबॉन फर्नांडिसच्या हेडिंगवर मायरन बोर्जिस चेंडूस योग्य दिशा दाखवू शकला नाही. 

ISL 2020-21: मुंबई सिटीस विजेतेपदाची प्रतीक्षा

उत्तरार्धात मार्कुस मस्कारेन्हासचा धोकादायक प्रयत्न सेझा अकादमीचा गोलरक्षक सपन सिंग याने रोखल्यामुळे स्पोर्टिंगची आघाडी एका गोलपुरती मर्यादित राहिली. सामन्यातील एक मिनिट बाकी असताना कुणाल याचा क्रॉस पास दिशाहीन करण्याच्या प्रयत्नात स्पोर्टिंगच्या मायरन फर्नांडिसने चेंडू आपल्या संघाच्या नेटमध्ये मारल्यामुळे सेझा अकादमीस बरोबरी साधता आली. इंज्युरी टाईममध्ये गौरव काणकोणकर याचा हेडर गोलपट्टीवरून गेल्याने स्पोर्टिंगला पुन्हा आघाडी मिळाली नाही.

संबंधित बातम्या