‘पर्रीकर बुद्धिबळा’त अर्जेंटिनाचा सर्जिओ विजेता

क्रीडा प्रतिनिधी
रविवार, 20 सप्टेंबर 2020

गोवा बुद्धिबळ संघटनेच्या श्री मनोहर पर्रीकर गोवा ग्रँडमास्टर आंतरराष्ट्रीय खुल्या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत अर्जेंटिनाचा सर्जिओ लाझ्झारी याने ब विभागात (२००० खालील एलो गुण) विजेतेपद प्राप्त केले. देश-विदेशातील मिळून ३२० बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. 

पणजी: गोवा बुद्धिबळ संघटनेच्या श्री मनोहर पर्रीकर गोवा ग्रँडमास्टर आंतरराष्ट्रीय खुल्या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत अर्जेंटिनाचा सर्जिओ लाझ्झारी याने ब विभागात (२००० खालील एलो गुण) विजेतेपद प्राप्त केले. देश-विदेशातील मिळून ३२० बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. 

स्पर्धेत यजमान भारतासह अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड व अमेरिकेतील बुद्धिबळपटूंनी ऑनलाईन भाग घेतला. एकूण तेरा फेऱ्यांची ही स्पर्धा चुरसपूर्ण ठरली. सर्जिओ लाझ्झारी (एलो १९२३), त्याचाच देशवासीय गोन्झालो गार्सिया (१७१७) व कर्नाटकाचा शरण राव (१९९२) यांचे समान ११.५ गुण झाले. टायब्रेकर गुणांत सर्जिओ याला पहिला, गोन्झालोस दुसरा, तर शरणला तिसरा क्रमांक मिळाला.

गोव्यातील बुद्धिबळपटूंत विल्सन क्रूझ (१८१५) याला ९.५ गुणांसह नववा क्रमांक प्राप्त केला. एथन वाझ याने ८.५ गुणांसह विसावा, तर तेवढेच गुण नोंदविलेल्या अनिरुद्ध भट याला २३वा क्रमांक मिळाला. शेन ब्रागांझा ९.५ गुणांसह गोव्यातील बुद्धिबळपटूंत सर्वोत्तम ठरला. याशिवाय देवेश नाईक (८.५ गुण) याला दुसरा, तर दत्ता कांबळी (८.५ गुण) याला तिसरा क्रमांक प्राप्त झाला. गोव्यातील महिला खेळाडूंत सयुरी नाईक (८.५ गुण), तन्वी हडकोणकर (८ गुण), श्रीलक्ष्मी कामत (८) यांना पहिले तीन क्रमांक मिळाले.
 
गोव्यातील अन्य खेळाडूंत साईरुद्र नागवेकर, यश उपाध्ये, तेजस शेट वेर्णेकर, आयुष शिरोडकर, जॉय काकोडकर, रुबेन कुलासो, आलेक्स सिक्वेरा, गुंजल चोपडेकर, निधी गावडे यांनाही बक्षिसे प्राप्त झाली. 

 आनंद बाबू यांनी स्पर्धेत मुख्य आर्बिटरची जबाबदारी पार पाडली. रविवारी (ता. २०) ड व ई गटातील स्पर्धा होईल. मुख्य अ गट स्पर्धा २ ऑक्टोबरला खेळली जाईल.

 

संबंधित बातम्या