सेझा अकादमीस स्वयंगोलमुळे गुण

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबच्या खेळाडूने स्वयंगोल केल्यामुळे त्यांना गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी गोलबरोबरीवर समाधान मानावे लागले, तर सेझा फुटबॉल अकादमीस एका गुणाची कमाई करता आली.

पणजी: वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबच्या खेळाडूने स्वयंगोल केल्यामुळे त्यांना गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी गोलबरोबरीवर समाधान मानावे लागले, तर सेझा फुटबॉल अकादमीस एका गुणाची कमाई करता आली.

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झालेला सामना 1-1 गोलबरोबरीत राहिला. क्लुसनर परेरा याच्या गोलमुळे वेळसाव क्लबने पूर्वार्धातील खेळात आघाडी घेतली होती, मात्र बदली खेळाडू विराज नाईक याच्या स्वयंगोलमुळे सेझा अकादमीची पिछाडी भरून निघाली.

बरोबरीच्या एका गुणामुळे पहिल्या लढतीत धेंपो क्लबकडून हार पत्करलेल्या सेझा अकादमीस गुणतक्त्यात खाते उघडता आले. वेळसाव क्लबचाही हा दोन लढतीतील पहिलाच गुण ठरला. पहिल्या लढतीत त्यांना कळंगुट असोसिएशनकडून हार पत्करावी लागली होती.

सामन्याच्या 32व्या मिनिटास गोलशून्य बरोबरीची कोंडी फुटली. क्लुसनर परेराने 30 यार्डावरून मारलेल्या सणसणीत फ्रीकिकवर सेझा अकादमीचा गोलरक्षक सपन सिंग यांचा अंदाज पूर्णपणे चुकला. सामन्याच्या 57व्या मिनिटास वेळसाव क्लबला धक्का बसला. सेझा अकादमीच्या खेळाडूचे हेडिंग विफल ठरविताना गडबडीत विराजने चेंडू आपल्याच संघाच्या नेटमध्ये मारला.

आज स्पर्धेत शनिवारी (ता. 6) धुळेर-म्हापसा येथे गार्डियन एंजल स्पोर्टस क्लब व धेंपो स्पोर्टस क्लब यांच्यात सामना होईल.

संबंधित बातम्या