गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धा कोरोनामुळे लांबण्याचे संकेत

dainik gomantak
सोमवार, 18 मे 2020

कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत होण्यासंदर्भात रिजिजू यांनी त्यावेळी साशंकता व्यक्त केली.

पणजी,

 गोव्यात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नियोजित असलेली ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोरोना विषाणू महामारीमुळे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडूनही संकेत मिळू लागले आहेत.

केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी काही दिवसांपूर्वी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीकडे बोलताना गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसंदर्भात मत व्यक्त केले. कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत होण्यासंदर्भात रिजिजू यांनी त्यावेळी साशंकता व्यक्त केली. यासंदर्भात आपण गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केल्याची माहितीही केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी त्या कार्यक्रमात दिली. भारतीय ऑलिंपिक संघटना (आयओए) आणि विविध क्रीडा महासंघांच्या संपर्कातही केंद्रीय क्रीडा मंत्रालय आहे.

गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०१६ पासून लांबणीवर पडलेली आहे. आता येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये स्पर्धा घेण्यास राज्य सरकारने तयारीच्या कामांना वेग दिलेला होता, पण कोविड-१९च्या लॉकडाऊनमुळे काही साधनसुविधा विषयक कामांवर प्रतिकुल परिणाम झालेला आहे. त्यातच देशातील कोरोना विषाणू संसर्ग परिस्थिती अजून पूर्णतः नियंत्रणात आलेली नाही, गोव्यातही नव्याचे कोविड-१९ संक्रमित रुग्ण सापडले आहेत. यामुळे राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन संकटात येऊ शकते.

स्पर्धेसाठी आवश्यक सर्व साधन सुविधा ऑगस्टपर्यंत तयार करण्याचे आश्वासन राज्य सरकारवतीने देण्यात आले आहे. या आशयाचे पत्र गोवा क्रीडा प्राधिकरणाचे (एसएजी) कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाई यांनी स्पर्धा तांत्रिक संचालन समितीचे (जीटीसीसी) अध्यक्ष मुकेश कुमार यांना पाठविले आहे. त्यापूर्वी क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे सचिव जे. अशोक कुमार यांनी गेल्या २७ एप्रिलला भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) सचिव राजीव मेहता यांना पत्र पाठविले होते. त्यात ३१ मेपर्यंत सर्व आवश्यक तयारीबाबत पुढे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे कळविण्यात आले होते. त्यानंतर ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबाबत कोविड-१९ परिस्थितीचे आकलन आणि आयओएशी सल्लामसलत करून पुढील निर्णय घेण्याचे नमूद करण्यात आले होते.

संबंधित बातम्या