स्लेजिंग करून विराटच्या वाटेला जाऊ नका..

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

मायदेशात होणाऱ्या भारताविरुद्धच्या मालिकेत भारतीय कर्णधार विराट कोहलीला स्लेजिंग करण्याचा प्रयत्न करू नका, तो आपल्यावरच पलटेल. कारण अशा प्रकारामुळे केवळ विराटलाच नव्हे तर संपूर्ण भारतीय संघाला अतिरिक्त प्रेरणा मिळते, असा इशारा आणि सावधगिरीचा सल्ला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार दस्तूरखुद्द स्टीव वॉने दिला आहे.

मेलबर्न : मायदेशात होणाऱ्या भारताविरुद्धच्या मालिकेत भारतीय कर्णधार विराट कोहलीला स्लेजिंग करण्याचा प्रयत्न करू नका, तो आपल्यावरच पलटेल. कारण अशा प्रकारामुळे केवळ विराटलाच नव्हे तर संपूर्ण भारतीय संघाला अतिरिक्त प्रेरणा मिळते, असा इशारा आणि सावधगिरीचा सल्ला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार दस्तूरखुद्द स्टीव वॉने दिला आहे.

आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ दुबईतूनच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होत आहे. तीन एकदिवसीय, तीन ट्‌वेन्टी-२० आणि चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. दोन्ही संघांच्या दृष्टीने प्रामुख्याने कसोटी मालिका महत्त्वाची आहे.

स्लेजिंगचा विराटवर काहीही परिणाम होणार नाही. अशा मोठ्या खेळाडूंविरुद्ध हे अस्त्र उपयोगी ठरत नाही, त्यापेक्षा त्यांना तसेच राहू द्या आणि आपापला खेळ करा, असे वॉने म्हटले आहे. विराटला स्लेजिंगद्वारे उसकवणे हे त्याला अधिक सर्वोत्तम कामगिरी करण्यास प्रेरित करणारे ठरू शकते, असेही वॉने सांगितले आहे.  

गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम पेनच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने विराट कोहलीच्या सहकाऱ्यांविरुद्ध शाब्दिक बाचाबाची केली होती. ही मालिका भारताने २-१ अशी जिंकली. ऑस्ट्रेलियामध्ये भारताने प्रथमच कसोटी मालिका जिंकण्यात यश मिळवले होते.
आयपीएलमध्ये चांगला करार मिळावा म्हणून ऑस्ट्रेलियन खेळाडू विराटशी पंगा घेत नाहीत अशी टीका ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्‍लार्कने काही महिन्यांपूर्वी केली होती, पण टीम पेनने ती अमान्य केली होती. 

चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात एका वर्षाची बंदी असल्यामुळे स्टीव स्मिथ भारताविरुद्धच्या गेल्या मालिकेत खेळला नव्हता. या वेळी तो उपलब्ध असणार आहे, त्यामुळे विराट विरुद्ध स्मिथ यांच्यामध्ये चांगला सामना रंगेल असे सांगून वॉ म्हणला, विराट हा श्रेष्ठ फलंदाज आहे. स्मिथही तेवढ्याच क्षमतेचा आहे, गेल्या भारत दौऱ्यात त्याने तीन शतके केली होती. त्यामुळे यावेळी हे दोघेही फलंदाज श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास सज्ज होतील.

विराट आता अधिक प्रगल्भ
विराट हा आता अधिक प्रगल्भ झाला आहे. भारतीय संघावर त्याचे पूर्णपणे नियंत्रण आहे, परदेशात मालिका जिंकण्याची सर्व क्षमता त्याने संघात निर्माण केली आहे, परदेशातही आपला संघ अव्वल आहे हे सिद्ध करण्यासाठी तो सज्ज आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध स्लेजिंगसारखे प्रयत्न करू नका, असे वॉने सांगितले आहे.

संबंधित बातम्या