
Keshav Maharaj Suffer Injury: क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असं म्हटलं जातं. कारण कोणत्याही क्षणी परिस्थितीती बदलू शकते. अशीच गोष्ट दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजबरोबर झाले आहे. आता त्याच्यासाठी आगामी वनडे वर्ल्डकप खेळण्याचे स्वप्नही भंगण्याची शक्यता आहे.
झाले असे की दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान विकेटचे सेलिब्रेशन करताना तो गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्या डाव्या टाचेच्या जवळ दुखापत झाली आहे. त्याआधी त्याने या सामन्याच्या दुसऱ्या डावात 2.5 षटकात 4 धावात 2 विकेट्स घेतल्या होत्या.
झाले असे की 19 व्या षटकात गोलंदाजी करत असताना 5 व्या चेंडूवर वेस्ट इंडिजचा अष्टपैलू काईम मायर्स विरुद्ध महाराजने पायचीतसाठी अपील केले. मात्र मैदानातील पंचांनी त्याला नाबाद दिले. त्यामुळे डीआरएस घेण्यात आला. हा रिव्ह्यू यशस्वी ठरला आणि मायर्सला विकेट गमवावी लागली.
ही विकेट गेल्याचे कळताच महाराजने सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. पण त्याने पहिले पाऊल पुढे टाकताच तो अचानक खाली बसला. त्याच्या टाचेजवळ वेदना झाल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा मेडिकल स्टाफ मैदानात आला होता. त्यावेळी तो वेदनेने कळवळत पालथा झोपला. अखेर काही वेळानंतर त्याला स्ट्रेचरवरून मैदानातून बाहेर नेण्यात आले.
दरम्यान, त्याच्या मैदानातून जाण्याने दक्षिण आफ्रिकेच्या खेळावर फारसा परिणाम झाला नाही. कारण दक्षिण आफ्रिकेने हा सामना 284 धावांनी जिंकला. याबरोबरच त्यांनी वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिला.
या सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे आता महाराजला शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. त्याच्यावर सोमवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता तो बरेच महिने क्रिकेटपासून दूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या वर्ल्डकपलाही मुकावे लागण्याची शक्यता आहे.
महाराजने आत्तापर्यंत 49 कसोटी सामन्यांमध्ये 158 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 27 वनडेत 29 विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच 25 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 22 विकेट्स घेतल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.