आक्रमणाची धुरा स्पॅनिश आघाडीपटू इगोर आंगुलोकडे

आक्रमणाची धुरा स्पॅनिश आघाडीपटू इगोर आंगुलोकडे
आक्रमणाची धुरा इगोर आंगुलोकडे

पणजी: आगामी मोसमात गोव्यातील चाहत्यांनी आपल्याकडून काय अपेक्षित ठेवावे... गोल, की व्यावसायिकता, असा सवाल करत स्पॅनिश आघाडीपटू इगोर आंगुलो याने एफसी गोवाच्या आक्रमणाची धुरा स्वीकारण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. 

इगोर एफसी गोवाशी करार करण्यापूर्वी पोलंडमध्ये चार मोसम खेळला. त्याचा संदर्भ देत, पोलंडमध्ये आपणास भरपूर प्रेम मिळाले, ते केवळ गोल नोंदविले यासाठीच नव्हे, तर आपण नेहमीच व्यावसायिक दृष्टिकोन बाळगला याकरता आहे, असे या ३६ वर्षीय स्ट्रायकरने नमूद केले. या अनुभवी आघाडीपटूकडून केवळ गोल नोंदविण्याबरोबरच एफसी गोवा संघाच्या आक्रमणात धडाका अपेक्षित आहे.

व्यावसायिक फुटबॉल खेळण्यासाठी इगोरने २००६ साली स्पेन सोडले. त्यानंतर फ्रान्समध्ये अल्पकाळ तो एएस कान्स संघाकडून खेळला, नंतर इतरत्रही खेळला. २०१६ पासून पोलंड त्याचे दुसरे घर बनले. तेथील गॉर्निक झाब्रझ संघाचा तो हुकमी एक्का ठरला. या संघातर्फे तो चार मोसम खेळला आणि प्रत्येक मोसमात सर्वाधिक गोल नोंदविले. पहिल्याच मोसमात त्याच्या कामगिरीमुळे गॉर्निक झाब्रझ संघ अव्वल श्रेणीसाठी (एक्स्ट्राक्लासा)  पात्रता मिळवू शकला. एक्स्ट्राक्लासा स्पर्धेतील मागील तीन मोसमात ९९ सामन्यांत ६३ गोल नोंदविल्यानंतर इगोरने गॉर्निक झाब्रझचा निरोप घेतला.

आक्रमक शैली भावली
इगोरने एफसी गोवाशी करार करण्यापूर्वी या संघाच्या शैलीचा अभ्यास केला. त्यावरून, या संघाला आपल्याप्रमाणेच पुढाकार घेत नेहमीच आक्रमण करणे आवडते, असे त्याचे मत आहे. गोव्यात येण्याची ही योग्य वेळ असून आपल्या फुटबॉल विकसित राखण्यासाठी एफसी गोवा हा उत्कृष्ट क्लब असल्याचे त्याचे म्हणणे आहे. क्लब आणि आपण नक्कीच सर्वोत्तम कामगिरी बजावू असा विश्वासही त्याने व्यक्त केलाय. आगामी मोसमात एफसी गोवा संघ एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत खेळणार आहे. 

संघ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळतोय हे ध्यानात घेत आपण गोव्यास प्राधान्य दिल्याचा पुनरुच्चार इगोरने केला. पोलंडमध्ये तब्बल १३ महिन्यांचा मोसम सफल केल्यानंतर इगोर आता गोव्यातील मोहिमेस उत्सुक आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com