एफसी गोवा संघाने स्पेनमधील तीस वर्षीय मध्यरक्षक आल्बर्टो नोगेरा याच्याशी करार

क्रीडा प्रतिनिधी
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

तीस वर्षीय आल्बर्टो नोगेरा याच्याशी दोन वर्षांसाठी करार

पणजी:  एफसी गोवा संघाने स्पेनमधील तीस वर्षीय मध्यरक्षक आल्बर्टो नोगेरा याच्याशी करार केला आहे. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील संघाचे तो २०२२ पर्यंत प्रतिनिधित्व करेल. 

एफसी गोवाने आगामी मोसमासाठी करारबद्ध केलेला नोगेरा हा चौथा नवा परदेशी खेळाडू आहे. नव्या मोसमासाठी गोव्याच्या संघाने इगोर आंगुलो, जॉर्ज ऑर्टिझ, इव्हान गोन्झालेझ या स्पॅनिश फुटबॉलपटूंना करारबद्ध केले आहे. स्पेनच्याच एदू बेदिया याच्यासह एफसी गोवा संघात आता एकंदरीत पाच परदेशी खेळाडू आहेत. चपळ सेंट्रल मिडफिल्डर असलेला नोगेरा याने स्पेनमधील नावाजलेल्या ॲटलेटिको माद्रिद संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. 

एफसी गोवाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर, हा संघ आपल्यासाठी योग्य असल्याचे मत नोगेरा याने व्यक्त केले. संघाचा भाग बनत असताना आपणास अतिशय आनंद होत असून लवकरच भारतात येण्यास उत्सुक असल्याचे त्याने नमूद केले. एफसी गोवा संघाबद्दल आपण चांगलं ऐकले आहे. या संघाचा भावी प्रकल्प खूप महत्त्वाकांक्षी आणि आव्हानात्मक असल्याचेही त्याने सांगितले. नोगेरा याने एफसी गोवाच्या चाहत्यांनाही सलाम केला आहे. ‘‘गोव्यातील लोकांच्या फुटबॉलबाबतच्या उत्कटतेबद्दल मी खूप ऐकले आहे. एफसी गोवाचे शर्ट परिधान करण्यासाठी आणि मैदानावर लढण्यासाठी जास्त प्रतीक्षा करू शकत नाही,’’ असे तो म्हणाला.

एफसी गोवा संघाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कूर यांनी नोगेरा याचे संघात स्वागत करताना, तो तांत्रिकदृष्ट्या अतिशय कुशल फुटबॉलपटू असल्याचे स्पष्ट केले. त्याच्यापाशी भरपूर अनुभव असून स्पेनमधील सेंगुडा मोसम संपवून तो गोव्यात येत असल्याची माहिती दिली. चेंडूवर ताबा राखत सामन्यात पुढाकार घेणे एफसी गोवाची शैली आहे, ती आल्बर्टो आत्मसात करेल, असा विश्वास रवी यांनी व्यक्त केला.

मध्यरक्षक आल्बर्टो नोगेरा याच्याविषयी...

  •      प्रारंभिक कारकिर्दीत गेटाफे युवा अकादमीत गुणवत्तेवर पैलू
  •      रायो व्हालेकानो संघानंतर ॲटलेटिको माद्रिदशी करारबद्ध
  •      ॲटलेटिको माद्रिदच्या क व ब संघानंतर २०१२ मध्ये सीनियर संघात दाखल
  •      नंतर इंग्लिश प्रीमियर लीगमधील ब्लॅकपूलचे, तसेच अझरबैजानमधील क्लबचेही प्रतिनिधित्व
  •      २०१४ मध्ये पुन्हा स्पेनमध्ये दाखल, लॉर्सा, न्युमानसिया, रेसिंग सांतान्दर संघातून मैदानात

संबंधित बातम्या