बंगळूर, जमशेदपूरच्या बचावाची परीक्षा

दैनिक गोमन्तक
रविवार, 27 डिसेंबर 2020

बंगळूर एफसी आणि जमशेदपूर एफसी या दोन्ही संघांनी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात आक्रमक शैली अवलंबिली आहे.

पणजी: बंगळूर एफसी आणि जमशेदपूर एफसी या दोन्ही संघांनी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात आक्रमक शैली अवलंबिली आहे. साहजिकच एकमेकांना आव्हान देताना त्यांच्या बचावफळीलाही परीक्षा द्यावी लागेल.

बंगळूर व जमशेदपूर यांच्यातील सामना सोमवारी (ता. 28) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. जमशेदपूर संघ उत्तरार्धात गोल स्वीकारतो, ही बाब त्यांच्यासाठी चिंताजनक आहे. त्यांच्याविरुद्ध उत्तरार्धात प्रतिस्पर्ध्यांनी सहा वेळा गोल केले आहेत. ही बाब बंगळूरच्या पथ्यावर पडू शकते. जमशेदपूर आणि त्यांचा हुकमी स्ट्रायकर नेरियूस व्हॅल्सकिस याचे आक्रमण रोखण्यासाठी आपण खास नियोजन केल्याचे बंगळूरचे प्रशिक्षक कार्ल्स कुआद्रात यांनी सांगितले.

बंगळूरने स्पर्धेतील सात सामन्यांत 11 गोल नोंदविले असून आठ गोल स्वीकारले आहेत. ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना जमशेदपूर एफसीने आठ लढतीत नऊ गोल नोंदविले असून तेवढेच गोल स्वीकारले आहेत. विशेष बाब म्हणजे, आतापर्यंत या दोन्ही संघांनी प्रतिस्पर्ध्यांना पेनल्टी फटका मिळू दिलेला नाही.

अगोदरच्या लढतीत पराभव पत्करलेला असल्यामुळे बंगळूर, तसेच जमशेदपूर संघ सोमवारी विजयासाठी इच्छुक असेल. अपेक्षित निकाल प्राप्त केल्यास त्यांना गुणतक्त्यातही सुधारणा करता येईल. बंगळूरने सात सामन्यातून प्रत्येकी तीन विजय व बरोबरी, तसेच एका पराभवासह 12 गुणांची कमाई केली आहे. ते सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मागील लढतीत एटीके मोहन बागानकडून एका गोलने निसटता पराभव झाल्याने त्यांची अपराजित मालिका संपुष्टात आली.

जमशेदपूरला अगोदरच्या लढतीत इंज्युरी टाईममध्ये गोल स्वीकारल्यामुळे एफसी गोवाकडून निसटती हार पत्करावी लागली. रिप्लेमध्ये गोल वैध असल्याचे स्पष्ट झाले, पण लाईन्समनने त्यावर मोहोर न उठवल्यामुळेही जमशेदपूरचे मागील लढतीत नुकसान झाले. त्यांनी आठ लढतीत दोन विजय, चार बरोबरी, दोन पराभव अशा कामगिरीसह 10 गुण नोंदविले असून ते सहाव्या स्थानी आहेत. चांगल्या संघाविरुद्ध जिंकण्याची क्षमता आपल्या संघापाशी आहे, त्यामुळे बंगळूरविरुद्ध सर्वोत्तम खेळ करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जमशेदपूरचे प्रशिक्षक कॉयल यांनी केले.

आणखी वाचा:

दशक टी -20 संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी: आयसीसीने केले जाहीर -

 

दृष्टिक्षेपात...

  • - जमशेदपूरच्या नेरियूस व्हॅल्सकिस याचे 6 गोल, पण मागील दोन लढतीत    गोलविना
  • - बंगळूरच्या सुनील छेत्री व क्लेटन सिल्वा यांचे प्रत्येकी 3 गोल
  • - बंगळूर, तसेच जमशेदपूरच्या स्पर्धेत प्रत्येकी 2 क्लीन शीट
  • - गतमोसमात जमशेदपूरमध्ये गोलशून्य बरोबरी, तर घरच्या मैदानावर       बंगळूर 2-0 फरकाने विजयी
  •  

संबंधित बातम्या