गोवा प्रो-लीगला पुरस्कर्ता अपेक्षित

किशोर पेटकर
शुक्रवार, 24 जुलै 2020

यंदाच्या मोसमापासून तीन मोसम प्रो-लीग स्पर्धा पुरस्कृत करण्यासाठी कोलकात्यातील एका आस्थापनाने उत्सुकता दर्शविली असून अंतिम निर्णय लवकरच होईल.

पणजी

गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेला लवकरच पुरस्कर्ता लाभू शकतो. यासंदर्भात चर्चा अंतिम टप्प्यात आहे.

प्राप्त माहितीनुसारयंदाच्या मोसमापासून तीन मोसम प्रो-लीग स्पर्धा पुरस्कृत करण्यासाठी कोलकात्यातील एका आस्थापनाने उत्सुकता दर्शविली असून अंतिम निर्णय लवकरच होईल. नव्या संभाव्य पुरस्कर्त्यांनी स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यासही तयारी दाखविली आहे. तीन टप्प्यात कोट्यवधी रुपयांचा करार करण्यास त्यांचे प्राधान्य असेल. याशिवाय एफसी गोवा संघ व्यवस्थापनानेही प्रो-लीग प्रायोजकतेसंदर्भात प्रस्ताव सादर केला आहे. येत्या काही दिवसांत जीएफएच्या व्यवस्थापकीय समितीची ऑनलाईन बैठक नियोजित असून त्यावेळी पुरस्कर्त्यांसंबंधी अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रस्ताव चर्चा सार्थकी लागल्यास यंदापासून जीएफएच्या प्रो-लीग स्पर्धेला पुरस्कर्ता लाभेल.

गोव्यातील अव्वल श्रेणी फुटबॉल स्पर्धा असलेली गोवा प्रो-लीग गेली काही वर्षे पुरस्कर्त्याविना खेळविणे जीएफएला भाग पडत आहे. त्यामुळे त्यांच्या तिजोरीवरही ताण येतो. २०१९-२० मोसमातील प्रो-लीग स्पर्धा कोरोना विषाणू महामारीमुळे अर्धवट राहिली असून विजेता जाहीर करण्यात आलेला नाही. गतमोसम आटोपता घेऊन जीएफएने २०२०-२१ मोसमास सुरवात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोविड-१९ मुळे गोव्यातील प्रतिकुल परिस्थिती लक्षात घेताराज्यस्तरीय फुटबॉल मोसम सुरू करण्याबाबत अजून स्पष्टता नाही. दरवर्षी ऑगस्टच्या मध्यास मोसमाला प्रारंभ होतो. यंदा कोविड-१९ मुळे गोव्यात २० मार्चनंतर एकही फुटबॉल सामना झालेला नाही. जीएफएच्या व्यवस्थापकीय समितीची बैठकही महामारीमुळे झालेली नाही.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या