स्पोर्टिंग क्लबच्या आशेवर पाणी

dainik gomantak
सोमवार, 6 जुलै 2020

कोविडमुळे गतमोसम अर्ध्यावर राहिल्याने प्रो-लीग विजेतेपद दूरचे

पणजी,

कोरोना विषाणू महामारीमुळे सद्यःस्थितीत २०१९-२० फुटबॉल मोसम पुढे खेळविणे शक्य नसल्याने गोवा फुटबॉल असोसिएशनचे (जीएफए) अध्यक्ष चर्चिल आलेमाव यांनी नव्या मोसमाच्या तयारीस लागण्याचे ठरविले आहे. मागील मोसम अर्ध्यावरच राहिल्याने स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाच्या आशेवर पाणी पडले आहे.

राज्यात सध्या कोविड-१९चा उद्रेक आहे. त्यामुळे २०१९-२० मोसमातील सर्व फुटबॉल स्पर्धा अर्धवटावस्थेत राहिल्या. या कारणास्तव प्रो-लीग स्पर्धेलाही विजेता नसेल. प्रो-लीग विजेतेपदासाठी स्पोर्टिंग क्लब द गोवा संघ प्रमुख दावेदार होता. स्पर्धा खंडित झाली तेव्हा त्यांच्या खाती सर्वाधिक ४४ गुण होतेपण त्यांचे विजेतेपद निश्चित झाले नव्हते. चर्चिल ब्रदर्सचे पाच सामने बाकी होते व त्यांच्या खाती ३७ गुण होते. जीएफए अध्यक्षांचा संघही विजेतेपदाच्या शर्यतीत कायम होतापरिणामी प्रो-लीग विजेता जाहीर करण्यात आलेला नाही.

जीएफएने संबंधितांना पत्र पाठवून २०१९-२० मोसम संपवत असल्याचे कळविले आहे. कोविड-१९मुळे गोव्यात २० मार्च २०२० नंतर एकही स्पर्धात्मक फुटबॉल सामना झालेला नाही. कोरोना विषाणूचे गोव्यातील रुग्ण वाढत असल्याने जीएफएला सामने खेळविणे अशक्य ठरले आहे. परिणामी मागील मोसम आटोपता घ्यावा लागला. लवकरच २०२०-२१ मोसमाची प्रक्रिया जीएफएकडून हाती घेतली जाईल. व्यवस्थापकीय समिती बैठकीविना मागील मोसम आटोपता घेणे जीएफएच्या काही पदाधिकाऱ्यांना पसंत पडलेले नाही. त्यात उपाध्यक्ष अँथनी पांगो आघाडीवर आहेत.

गोव्यातील अव्वल साखळी फुटबॉल स्पर्धेचे १९९८ साली प्रो-लीग असे नामकरण झाले. तेव्हापासून स्पोर्टिंग क्लबने ही स्पर्धा चार वेळा जिंकली आहे. चर्चिल ब्रदर्सही चार वेळा या स्पर्धेत विजेता ठरला आहे. प्रो-लीग स्पर्धेत साळगावकर एफसीने सर्वाधिक सात वेळातर धेंपो स्पोर्टस क्लबने पाच वेळा विजेतेपद पटकाविले आहे. एफसी गोवा संघ एकवेळ विजेता ठरला आहे.

संबंधित बातम्या