क्रीडा मंत्रालयाकडून खेळ रत्न पुरस्कार विजेत्यास मिळणार एवढी रक्कम

क्रीडा मंत्रालयाकडून खेळ रत्न पुरस्कार विजेत्यास मिळणार एवढी रक्कम
sports ministry announces hike in prize money for national sports award

नवी दिल्ली: केंद्रीय क्रीडा मंत्रालय क्रीडा पुरस्काराच्या बक्षीस रकमेत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्याचा विचार करीत आहे. अर्जुन पुरस्कार विजेत्यांची रक्कम पाच लाखांवरून १५ लाख, तर खेल रत्न पुरस्कार विजेत्यांना साडेसात लाखाऐवजी २५ लाख देण्याचा विचार आहे. त्याचबरोबर याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाल्यास सरकारच्या तिजोरीवर जवळपास साडेनऊ कोटींचा बोजा पडण्याची शक्‍यता आहे. 

केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू क्रीडा पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्याचा गांभीर्याने विचार करीत आहेत. त्यांनी याबाबत क्रीडा मंत्रालयातील अधिकाऱ्यांसह चर्चा केली आहे. बक्षिसात मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. त्याला काही दिवसात अंतिम स्वरूप देण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. यंदा एकंदर ६२ जणांना क्रीडा पुरस्कार देण्याची शिफारस झाली आहे. त्यांना एकंदर ९ कोटी ४० लाख प्रस्तावित आहेत. त्याशिवाय विविध संस्थांनाही पुरस्कार देण्यात येतात. त्यांच्याही बक्षिसात वाढ झाल्यास ही रक्कम दहा कोटीपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. 

क्रीडा पुरस्कारासह देण्यात येत असलेली बक्षीस रक्कम खूपच कमी आहे, अशी तक्रार अनेक खेळाडूंनी क्रीडामंत्र्यांकडे केली होती. त्यामुळे आता त्यात वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी घेतला आहे. त्याची औपचारिक घोषणा राष्ट्रीय क्रीडा दिनी (२९ ऑगस्ट) होण्याची शक्‍यता आहे. त्याच दिवशी राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची अधिकृत घोषणा होण्याची शक्‍यता आहे. यंदापासून ही बक्षीस रक्कम दिली जाण्याचा विचार आहे.

अपेक्षित एकंदरीत बक्षीस रक्कम

  • पाच खेळाडूंची खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस: प्रत्येकी २५ लाख - एकंदर १ कोटी २५ लाख
  • २९ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस: प्रत्येकी १५ लाख - एकंदर ४ कोटी ३५ लाख
  • ५ जणांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस, तर १५ जणांची ध्यानचंद पुरस्कारासाठी शिफारस: प्रत्येकी १५ लाख - ३ कोटी
  • ८ जणांची द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कारासाठी शिफारस: प्रत्येकी १० - एकंदर ८० लाख 
  • एकंदर ६२ जणांना ९ कोटी ४० लाख प्रस्तावित.


संपादन: ओंकार जोशी

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com