एफसी गोवासाठी नवा तंदुरुस्ती प्रशिक्षक

Kishor Petkar
मंगळवार, 14 जुलै 2020

स्पेनच्या हावियर गोन्झालेझ यांची आगामी मोसमासाठी नियुक्ती

पणजी

एफसी गोवा संघाने आगामी आयएसएल आणि एएफसी चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील मोहिमेसाठी नवा तंदुरुस्ती (स्ट्रेंग्थ अँड कडिंशनिंग) प्रशिक्षक नियुक्त केला आहे. स्पेनच्या हावियर गोन्झालेझ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

स्पेनमधील ला-लिगा संघ रियल व्हालाडोलिडतसेच सायप्रसच्या एईके लार्नाका या संघासोबत गोन्झालेझ यांनी काम केले आहे. शारीरिक तंदुरुस्ती मार्गदर्शक या नात्याने त्यांच्यापाशी आठ वर्षांचा अनुभव आहे. २०२२ विश्वकरंडक स्पर्धा पात्रता फेरीत त्यांनी तैवानच्या राष्ट्रीय संघाला तंदुरुस्तीविषयक मार्गदर्शन केले होते.

हावियर गोन्झालेझ यांच्या नियुक्तीनंतर मुख्य प्रशिक्षक ह्वआन फेरॅन्डो यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवाच्या सपोर्ट स्टाफ आणखी एकाची भर पडली आहे. गोव्याचे क्लिफर्ड मिरांडा यांचा सहाय्यक प्रशिक्षक या नात्याने करार वाढविण्यात आला आहे.

‘‘एफसी गोवात रुजू होताना मला आनंद होत आहे,’’ अशी प्रतिक्रिया गोन्झालेझ यांनी दिली. एफसी गोवा हा आयएसएल स्पर्धेतील सफल संघ आहे आणि ते एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत खेळणार आहेत हा उल्लेख करत गोन्झालेझ यांनी फेरॅन्डो यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास उत्सुकता व्यक्त केली आहे. ‘‘एफसी गोवाकडे हावी असणे हे खूपच चांगले आहे,’’ असे फेरॅन्डो यांनी नव्या तंदुरुस्ती प्रशिक्षकाचे स्वागत करताना सांगितले. खेळाडूंची तंदुरुस्ती आणि त्यांच्या गरजांची हावियर यांना सखोल समज असल्याचे फेरॅन्डो यांनी नमूद केले. यंदा मोसमपूर्व कालावधी वाढला आहे. त्यामुळे हावी याचे संघासाठी योगदान महत्त्वपूर्ण असेल याकडे फेरॅन्डो यांनी लक्ष वेधले. 

संपादन - अवित बगळे

 

संबंधित बातम्या