गोन्झालेझ म्हणतो.. यशासाठी मानसिक सक्षमता आवश्यक

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

स्पर्धेपूर्वीची तयारी अतिशय महत्त्वाची असते. त्याच्या तयारीसाठी आम्ही तयार होत आहोत, असे गोन्झालेझने गोव्यात विलगीकरणात गेल्यानंतर सांगितले. येथे येण्याची लांब प्रतीक्षा संपुष्टात आल्याचा आनंद व्यक्त करून संघसहकारी, प्रशिक्षक व इतरांसमवेत वेळ व्यतित करण्यासाठी गोन्झालेझने उत्सुकता प्रदर्शित केली आहे. 

पणजी- यशप्राप्तीसाठी मानसिक सक्षमता आवश्यक आहे, असे मत एफसी गोवा संघाचा नवा स्पॅनिश आघाडीपटू इव्हान गोन्झालेझ याने व्यक्त केले. आगामी मोसमात आव्हाने स्वीकारण्यासाठी तो सज्ज होत आहे.

एफसी गोवाचे स्पॅनिश प्रशिक्षक ह्वआन फेरॅन्डो, सपोर्ट स्टाफ, तसेच स्पॅनिश खेळाडू गतआठवडाअखेर गोव्यात दाखल झाले. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या कोविड-१९ मार्गदर्शक शिष्टाचारानुसार हे सर्व परदेशी सध्या चौदा दिवसीय अलगीकरणात आहेत.

स्पर्धेपूर्वीची तयारी अतिशय महत्त्वाची असते. त्याच्या तयारीसाठी आम्ही तयार होत आहोत, असे गोन्झालेझने गोव्यात विलगीकरणात गेल्यानंतर सांगितले. येथे येण्याची लांब प्रतीक्षा संपुष्टात आल्याचा आनंद व्यक्त करून संघसहकारी, प्रशिक्षक व इतरांसमवेत वेळ व्यतित करण्यासाठी गोन्झालेझने उत्सुकता प्रदर्शित केली आहे. 
आगामी मोसमात तीस वर्षीय गोन्झालेझ याच्यासमवेत एफसी गोवाच्या बचावफळीत ऑस्ट्रेलियन जेम्स डोनाची याच्याकडूनही मोठ्या अपेक्षा असतील. गोन्झालेझ यापूर्वी स्पेनमधील कल्चरा लिओनेसा संघातून खेळलेला आहे, तेथील प्रभाव तो एफसी गोवातर्फे खेळताना प्रदर्शित करू इच्छितो. 

कोविड-१९ महामारीमुळे यावेळची आयएसएल स्पर्धा गोव्यात रिकाम्या स्टेडियममध्ये खेळली जाईल. लीगमधील प्रत्येकासाठी हे वातावरण आव्हानात्मक असेल याची जाणीव गोन्झालेझला आहे. बरेच खेळाडू आपल्या कुटुंबीयांपासून दूर असतील. त्यामुळे आम्हाला मानसिकदृष्ट्या खंबीर होणे गरजेचे आहे. दिवसागणिक उत्कृष्ट बनण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत करू. प्रत्येक दिवशी सुधारणा साधत खडतर मेहनतीवर आमचा भर राहील, असे गोन्झालेझ आत्मविश्वासाने म्हणाला. 

संबंधित बातम्या