अमेरिकन टेनिस स्पर्धेत डॉमनिक थिमकडून सुमीत नागल पराभूत

अमेरिकन टेनिस स्पर्धेत डॉमनिक थिमकडून सुमीत नागल पराभूत
Sumit Nagal out from US Open after straight sets loss by Dominic Thiem

न्यूयॉर्क: अमेरिकन टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मजल मारून भारतीयांसाठी आशेचा किरण ठरलेला सुमीत नागल जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या डॉमनिक थिमकडून तीन सेटमध्ये पराभूत झाला; परंतु त्याच्या खेळाचे कौतुक झाले.

जागतिक टेनिसमध्ये चांगलाच अनुभव असलेल्या थिमने हा सामना ६-३, ६-३, ६-२ असा जिंकला. विशेष म्हणजे हा विजय मिळवला त्याच दिवशी थिमचा वाढदिवसही होता. थिमने गतवर्षी ऑस्ट्रेलिया ओपनच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. त्याच्या दृष्टीने नागल नवखा खेळाडू असला तरी तो सावध होता म्हणून थिमने नागलच्या खेळाचे व्हिडीओ पाहिले होते. त्याच्या वेगवान फोरहॅंडची जाणकारी मिळवली होती. त्यामुळे थिमला नागलविरुद्ध डावपेच तयार करता आले. त्याने नागलला फोरहॅंडचा फटका मारता येईल, त्या दिशेने चेंडू मारलेच नाही.

मरेची मजल दुसऱ्या फेरीपर्यंतच
मोठ्या अपेक्षांनी टेनिसमध्ये पुनरागमन करणाऱ्या अँडी मरेची वाटचाल यूएस ओपनच्या दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आली. मात्र महिलांमध्ये विक्रमी विजेतेपदाशी बरोबरी करण्याची संधी असलेल्या सेरेना विल्यम्सने झंझावात कायम ठेऊन तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

१५ व्या मानांकित फेलिक्‍स अग्युर अलियासेमी या २० वर्षीय कॅनेडियन युवकाने मरेचा ६-२, ६-३, ६-४ असा पराभव केला. ही लढत २ तास ८ मिनिटे चालली. २०१९ च्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेनंतर मरे प्रथम टेनिस कोर्टवर उतरलेला आहे. सलामीच्या सामन्यात त्याने ४९ व्या मानांकित योशिहितो निशिओकाचा पराभव करून शानदार सुरुवात केली होती, पण दुसऱ्या फेरीचा अडथळा त्याला पार करता आला नाही. दुसऱ्या फेरीच्या सामन्यात अग्युरने मरेला संधी दिली नाही. २४ बिनतोड सर्व्हिस करताना त्याने ५२ विनर्स मारले. या तुलनेत मरेला अवघ्या दोनच बिनतोड सर्व्हिस करता आल्या आणि त्याचे नऊ फटके गुण मिळवून देणारे ठरले.

महिलांमध्ये माजी विजेत्या सेरेना विल्यम्सने आपला धडाका कायम ठेवला आहे. दुसऱ्या फेरीत तिने रशियाच्या मार्गारिटा गासप्रेयनचा ६-२, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सेरेनाचा तिसऱ्या फेरीत सामना स्लोनी स्टेफन्सशी होणार आहे.

संपादन: ओंकार जोशी

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com