दिल्लीचा आणखी एक दारुण पराभव, तर हैदराबादच्या आशा कायम

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

हैदराबादविरुद्ध आज चारी मुंड्या चीत होणाऱ्या दिल्लीची गोलंदाजी एकदमच निष्प्रभ ठरली. रबाडा, नॉर्किया अशा गोलंदाजांसमोर हैदराबादने २ बाद २१९ धावांचा डोंगर उभा केला त्यानंतर दिल्लीची ५ बाद ७८ अशी दारुण अवस्था केल्यानंतर त्यांचा डाव १३१ धावांत गुंडाळला.  

दुबई- प्लेऑफच्या उंबरठ्यावर येऊन दिल्ली कॅपीटलची गाडी बंद पडल्यासारखी झाली आहे. सलग दुसऱ्या सामन्यात त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादने आजचा हा सामना ८८ धावांनी जिंकून स्वतःच्या आशा मात्र उंचावल्या.

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत पहिल्या टप्यात सर्वात यशस्वी संघ म्हणून दिल्लीची वाटचाल सुरू होती, परंतु १० सामन्यात १४ गुण मिळवल्यानंतर त्यांना सलग दोन सामन्यात दारुण पराभव स्वीकारावे लागले आहेत. याच वेळी हैदराबादने १२ सामन्यातून १० गुण कमवले आहेत.

हैदराबादविरुद्ध आज चारी मुंड्या चीत होणाऱ्या दिल्लीची गोलंदाजी एकदमच निष्प्रभ ठरली. रबाडा, नॉर्किया अशा गोलंदाजांसमोर हैदराबादने २ बाद २१९ धावांचा डोंगर उभा केला त्यानंतर दिल्लीची ५ बाद ७८ अशी दारुण अवस्था केल्यानंतर त्यांचा डाव १३१ धावांत गुंडाळला.  यंदाच्या स्पर्धेत केवळ दुसरा सामना खेळणाऱ्या वृद्धिमन साहाने ८७ धावांचा तडाखा दिला. वाढदिवस असलेल्या डेव्हिड वॉर्नरने ६६ धावा तडकावल्या या दोघांचा स्ट्राईक रेट १९० च्या पुढे होता त्यांनी दहा पेक्षा अधिक धावांच्या सरासरीने १०७ धावांची सलामी दिली तेथेच हैदराबाद द्विशतकी मजल मारणार हे निश्‍चित झाले होते.

दिल्ली फलंदाजांची शरणागती

आव्हान भले मोठे असले तरी त्याचा सामना करण्याची जिद्द दिल्ली फलंदाजांना दाखवता आली नाही. शिखर धवन भोपळाही फोडू शकला नाही. त्यानंतर दिल्ली फलंदाजांची ड्रेसिंग रुमध्ये परतण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. मायकेल स्टॉयनिस, कर्णधार श्रेयस अय्यर, अक्षर पटेल एकेरी धावांत बाद झाले. अजिंक्य रहाणे आणि हेटमायर यांनी दुहेरी धावा केला त्यानंतर रिषभ पंतच्या ३६ धावांमुळे पराभव लांबला इतकेच.  

रशिद खानचा विक्रम
रशिद खानने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम स्पेल टाकताना ४ षटकांत सात धावांत तीन विकेट मिळवल्या.
 

संबंधित बातम्या