सुरेश रैनाची 'त्या' कारणामुळे आयपीएलमधून माघार

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

दुबईतील हॉटेलमध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनी, प्रशिक्षक यांच्याप्रमाणे आपल्या रूमला बाल्कनी नसल्याने रैनाचा इगो दुखावला आणि त्यातून हे माघारीचे नाट्य घडल्याची चर्चा आहे.

नवी दिल्ली: आयपीएल सुरू होण्यापूर्वीच माजी विजेत्या चेन्नई संघातील मानामपमान नाट्य रंगले आहे. सुरेश रैनाची वैयक्तिक कारणामुळे माघार, असे चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले; परंतु आता ‘ते’ खरे कारण बाहेर येऊ लागले आहे. दुबईतील हॉटेलमध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनी, प्रशिक्षक यांच्याप्रमाणे आपल्या रूमला बाल्कनी नसल्याने रैनाचा इगो दुखावला आणि त्यातून हे माघारीचे नाट्य घडल्याची चर्चा आहे.
  
धोनीच्या नेतृत्वाखाली नवे आव्हान स्वीकारण्यास सज्ज होत असलेल्या चेन्नई संघाला ११ सपोर्ट स्टाफ आणि दोन खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अगोदरच धक्का बसलेला आहे, त्यामुळे सरावासाठी त्यांना मैदानात उतरता आलेले नाही, त्यातच अनुभवी खेळाडू रैनाने अचानक माघार घेतल्याने खळबळ उडाली.

रैनाच्या नातेवाईकांची हत्या झाल्यामुळे त्याने माघार घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध होत होते, परंतु चेन्नई संघाचे मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी चेन्नई संघाची बाजू मांडली आहे.

दुबईत दाखल होताच इतर संघांप्रमाणे चेन्नईचा संघही हॉटेलमध्ये विलगीकरणात होता. पण यात रैनाचे वर्तन त्यांच्या संघ व्यवस्थापनाला खटकत होते. श्रीनिवासनही त्याच्यावर नाराज होते. चेन्नई संघाच्या नियमानुसार कर्णधार, प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांना हॉलेटमध्ये सूट (प्रशस्त रूम) दिला जातो, परंतु रैना संघातील अनुभवी खेळाडू असल्यामुळे त्यालाही सूट देण्यात आला होता; परंतु त्याच्या सुटला बाल्कनी नव्हती, ही बाब रैनाला पटली नाही आणि त्याने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला असावा, अशी माहिती आयपीएलच्या सूत्रांनी दिली.

हरभजनही माघार घेणार?
एकीकडे सुरेश रैनाचे प्रकरण गाजत असताना चेन्नई संघाचा आणखी एक अनुभवी खेळाडू हरभजन सिंगही कोरोनाच्या भीतीमुळे माघार घेण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. अमिरातीला रवाना होण्यापूर्वी चेन्नई संघाचे चिदंबरम स्टेडियमवर चार दिवसांचे सराव शिबिर झाले होते. हरभजन त्यात उपस्थित राहिला नव्हता, तसेच चेन्नई संघाबरोबर त्याने दुबईमघ्येही जाण्यास नकार दिला होता. 

रैनासाठी चेन्नईचे दरवाजे बंद?
रैनाच्या या वागणुकीवरून श्रीनिवासन प्रचंड नाराज झाले आहेत. रैनासाठी चेन्नईचे दरवाजे बंद झाल्याचे बोलले जात आहे. पुढील मोसमातील आयपीएल पाच महिन्यानंतर होणे अपेक्षित आहे, पण रैनाला पुन्हा स्थान मिळण्याची शक्‍यता कमी असल्याचे वृत्त आहे. पुढील मोसमासाठी सर्व खेळाडूंचा नव्याने लिलाव होणार आहे, त्यामुळे तो लिलावात उपलब्ध होऊ शकतो.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या