मुंबईच्या कोणत्या फलंदाजाने अर्जून तेंडूलकरच्या एकाच षटकात तब्बल २१ धावा फटकावल्या?

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेची सुरूवात होण्याआधीच आपण या मालिकेसाठीही तयार असल्याचे दाखवून देत त्याने फक्त ४७ चेंडूंमध्ये तब्बल १२० धावा केल्या यात १० चौकार आणि ९ षटकारांचा समावेश आहे.

मुंबई- सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेन्टी मालिकेपूर्वी झालेल्या सराव सामन्यात सुर्यकुमार यादवने भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जून याच्या एका षटकात तब्बल 21 धावा लुटल्या. या मालिकेपू्र्वी झालेल्या सराव सामन्यात मुंबईने दोन गटांत सराव सामने आयोजित केले होते. यात गट ब कडून तिसऱ्या क्रमांकावर  फलंदाजीसाठी येत सुर्यकुमारने ही कामगिरी केली आहे.  
 
आयपीएलमध्ये मुंबईला एकहाती सामने जिंकवून दिलेल्या ३० वर्षीय सुर्यकुमारला भारतीय संघात मात्र स्थान देण्यात आले नाही. सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेची सुरूवात होण्याआधीच आपण या मालिकेसाठीही तयार असल्याचे दाखवून देत त्याने फक्त ४७ चेंडूंमध्ये तब्बल १२० धावा केल्या यात १० चौकार आणि ९ षटकारांचा समावेश आहे. यात एका षटकात त्याने अर्जून तेंडूलकरच्या गोलंदाजीवर तब्बल २१ धावा केल्या. अनुभवाची कमतरता असलेल्या अर्जूनच्या गोलंदाजीवर त्याने आक्रमक फलंदाजी करत ही कामगिरी केली.  

 मुंबईच्या रणजी संघात खेळणाऱ्या सुर्यकुमारने या नॉक आउट मालिकेआधीच खेळलेली या खेळीमुळे त्याच्याकडून संघाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सुर्यकुमारने आयपीएलमध्येही कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाची भीस्त सांभाळत अतिशय दिमाखदार खेळ्या साकारल्या होत्या. त्याच्या आयपीएलच्या प्रदर्शनानंतर त्याला भारतीय संघात स्थान देण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, त्याची तीन प्रकारांपैकी एकाही प्रकारात संघात वर्णी लागली नाही. आता त्याने साकारलेल्या या खेळीमुळे सय्यद मुश्ताक अली मालिकेमध्येही तो कशी फलंदाजी करणार आहे याचा अंदाज सुरूवातीच्या खेळीवरून लावता येईल.

संबंधित बातम्या