वन-डेत गोव्यातर्फे सर्वाधिक शतके स्वप्नीलची

किशोर पेटकर
रविवार, 2 ऑगस्ट 2020

एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्यातर्फे सर्वांत पहिले शतकही अर्थातच स्वप्नीलनेच नोंदविले.

पणजी

विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्यातर्फे सर्वाधिक शतकांचा मान शैलीदार फलंदाज स्वप्नील अस्नोडकर याच्या खाती आहे. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेप्रमाणे झटपट क्रिकेटमध्येही या माजी सलामीवीराने अव्वल क्रमांक राखला आहे.

एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्यातर्फे सर्वांत पहिले शतकही अर्थातच स्वप्नीलनेच नोंदविले. २००४-०५ मोसमात त्याने मडगाव येथे नाबाद १२० धावांची खेळी केली. विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत त्याने एकूण ५ शतकांची नोंद केली आहे. २०११-१२ मोसमात बंगळूर येथे हैदराबादविरुद्ध नोंदविलेल्या १२७ धावा त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोच्च आहेत. प्रथम श्रेणी एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्वप्नीलच्या नावे एकूण ६ शतके आहेत. एक शतक त्याने देवधर करंडक स्पर्धेत दक्षिण विभागाकडून खेळताना नोंदविले. २००७ मध्ये अहमदाबाद येथे त्याने पूर्व विभागाविरुद्ध १०७ धावांची खेळी केली होती.

स्वप्नीलनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये गोव्याकडून डावखुऱ्या सगुण कामतने ३ शतके नोंदविली आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये गोव्याच्या सौरभ बांदेकर व अमोघ देसाई यांनी प्रत्येकी २ वेळा शतकी वेस पार केली आहे. याशिवाय एस. श्रीरामरीगन पिंटोअमित यादवजे. अरुणकुमारअजय रात्रारोहित अस्नोडकरकीनन वाझआदित्य कौशिक यांनी प्रत्येकी एक शतक झळकाविले आहे.

विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्यातर्फे २०१९-२० मोसमापर्यंत १२ वेगवेगळ्या फलंदाजांकडून एकूण २० शतकांची नोंद झाली आहे.

 सर्वोच्च धावा श्रीरामच्या...

तमिळनाडूचा डावखुरा सलामीवीर एस. श्रीराम गोव्याकडून खेळला आहे. त्याने २००९-१० मोसमात चेन्नई येथे केरळविरुद्ध नाबाद १४८ धावांची खेळी केली. विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्यातर्फे या सर्वोच्च वैयक्तिक धावा आहेत.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या