आगामी ट्‌वेंटी-२० विश्वकरंडक भारताऐवजी अमिरातीत?

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 डिसेंबर 2020

विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पाक संघाच्या व्हिसाबाबत आयसीसी तसेच भारतीय मंडळाकडून लेखी आश्‍वासन २०२१ च्या सुरुवातीस हवे असे वासिम खान यांनी सांगितले होते. आता त्यांनी भारतातील स्पर्धाच अन्यत्र होईल असा दावा केला. ​

लाहोर- भारतात २०२१ मध्ये होणारी विश्‍वकरंडक ट्‌वेंटी २० स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत होण्याची शक्‍यता आहे, असा दावा पाक क्रिकेट मंडळाचे सीईओ वासिम खान यांनी केला. 

विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पाक संघाच्या व्हिसाबाबत आयसीसी तसेच भारतीय मंडळाकडून लेखी आश्‍वासन २०२१ च्या सुरुवातीस हवे असे वासिम खान यांनी सांगितले होते. आता त्यांनी भारतातील स्पर्धाच अन्यत्र होईल असा दावा केला.

‘‘भारतातील विश्‍वकरंडक ट्‌वेंटी २० स्पर्धेबाबत अजूनही अनिश्‍चितता आहे. तेथील कोरोना परिस्थितीमुळे स्पर्धा अमिरातीत होऊ शकेल,’ असे त्यांनी मुलाखतीत सांगितले.
भारतात नव्या वर्षाच्या सुरुवातीस इंग्लंडविरुद्धची मालिका आहे. त्यापाठोपाठ  आयपीएल आहे, याकडे लक्ष वेधल्यावर वासिम खान यांनी स्पर्धेबाबतचे चित्र एप्रिलपर्यंत कळेल असाही दावा केला. यंदाची (२०२०) ऑस्ट्रेलियात होणारी विश्‍वकरंडक ट्‌वेंटी २० स्पर्धा कोरोनामुळे झाली नाही. ही स्पर्धा २०२२ मध्ये होईल. त्यापूर्वी भारतात २०२१ मध्ये विश्‍वकरंडक ट्‌वेंटी २० होईल.

भारतात स्पर्धा झाल्यास पाक संघास व्हिसा देण्याबाबतचे लेखी आश्‍वासन जानेवारीपर्यंत हवे आहे, याबाबत आम्ही प्रतीक्षेत आहोत. आमच्या अध्यक्षांनी पत्रही लिहिले आहे. भारत आणि पाकमधील संबंध पाहता पाक संघाच्या व्हिसाबाबत लेखी आश्‍वासन आवश्‍यक आहे, असे त्यांनी सांगितले. 
 

संबंधित बातम्या