युवा रोहितकडून मोठ्या अपेक्षा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

प्रतिभावान युवा फुटबॉलपटू रोहित दानू याला यंदा इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पदार्पणाची संधी लाभत असून त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा बाळगता येतील.

पणजी :  प्रतिभावान युवा फुटबॉलपटू रोहित दानू याला यंदा इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पदार्पणाची संधी लाभत असून त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा बाळगता येतील. या १८ वर्षीय आघाडीपटूस हैदराबाद एफसीने करारबद्ध केले आहे.रोहित भारताचा माजी ज्युनियर आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आहे. आय-लीग स्पर्धेत त्याने इंडियन एरॉज संघातून खेळताना छाप पाडली. गोल नोंदविण्याची त्याची नैसर्गिक क्षमता पाहता, तो आयएसएल स्पर्धेतही आव्हान स्वीकारून यशस्वी ठरू शकतो. नव्या आव्हानासाठी आपण सकारात्मक असल्याचे रोहितने नमूद केले. संधी मिळाल्यानंतर शंभर टक्के योगदान देण्याचे त्याचे उद्दिष्ट्य आहे.

वयोगट पातळीवर प्रेक्षणीय खेळाने रोहितने लक्ष वेधले आहे, आता त्याला सीनियर पातळीवर गुणवत्ता सिद्ध करायला मिळत आहे. आयएसएल स्पर्धेसाठी हैदराबाद एफसीने युवा गुणवत्तेवर विश्वास दाखविला आहे. त्यात रोहितचाही समावेश आहे. या संघात राष्ट्रीय संघातील आदिल खान, सुब्रत पॉल, हालिचरण नरझारी, निखिल पुजारी आदींचा समावेश आहे. या अनुभवी खेळाडूंसोबत खेळताना रोहित दानूस बऱ्याच गोष्टी आत्मसात करता येतील. सीनियर खेळाडूंचे मार्गदर्शन या युवा आघाडीपटूसाठी मौलिक असेल.

रोहित दानू आय-लीग स्पर्धेत इंडियन एरोजतर्फे दोन मोसम खेळला. आघाडीफळीतील सातत्यपूर्ण कामगिरीने त्याने वयोगट पातळीवर ठसा उमटविला. आयएसएलच्या मोसमपूर्व सराव लढतीत भारताचा दिग्गज आघाडीपटू सुनील छेत्रीच्या विरोधात तो खेळला आहे. आयएसएल स्पर्धेत नावाजलेल्या खेळाडूंविरुद्ध खेळताना रोहितचा कस लागेल आणि त्याकडे फुटबॉल चाहत्यांचे लक्ष असेल. सुनील छेत्रीच्या विरोधात खेळणे आपली स्वप्नपूर्ती असल्याची भावना रोहितने व्यक्त केली. त्या लढतीतून खूप प्रेरणा मिळाली आणि स्वतःला सिद्ध करण्याचे ध्येय गवसल्याचे रोहितने नमूद केले. छेत्रीप्रती आपणास खूप आदर असल्याचेही त्याने सांगितले. 

प्रगतिपथाचे ध्येय
रोहितने सीनियर पातळीवर खेळताना प्रगतिपथावर राहण्याचे ध्येय बाळगले आहे. खडतर मेहनत घेत खेळात प्रगतिपथावर राहण्याचे ध्येय आहे आणि पूर्वीपेक्षा जास्त मजबूत खेळ करण्याचे उद्दिष्ट्य आहे, असे रोहित दानूने भविष्यकालीन लक्ष्याविषयी सांगितले.

संबंधित बातम्या