आयपीएल प्रायोजकत्वात टाटा सन्सची आघाडी?

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

पाच कंपन्यांनी निविदा सादर केल्याचे समजते. यात टाटा सन्ससह, भारतीय संघाचे जर्सी प्रायोजक बायजू, रिलायन्स जिओ, पतंजली अन ॲकेडमी यांचा समावेश आहे. १८ ऑगस्ट रोजी यातून एकाची निवड होणार आहे.

मुंबई: देशातील विश्‍वासार्ह उद्योग समूह म्हणून नावाजलेले टाटा सन्स यांनी आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी निविदा दाखल केल्याचे वृत्त आहे आणि इतर पाच स्पर्धक असले तरी टाटा सन्स आघाडीवर असल्याची चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.

 

आयपीएल अमिरातीत होणार हे निश्‍चित झाल्यानंतर आता मुख्य प्रायोजक कोण, याची उत्सुकता वाढलेली आहे. विवोबरोबरच्या नात्याला यंदाच्या मोसमासाठी स्वल्पविराम दिल्यानंतर बीसीसीआयने नव्या प्रायोजकासाठी निविदा जाहीर केली आणि सादर करण्याचा आजचा अखेरचा दिवस होता. 

 

पाच कंपन्यांनी निविदा सादर केल्याचे समजते. यात टाटा सन्ससह, भारतीय संघाचे जर्सी प्रायोजक बायजू, रिलायन्स जिओ, पतंजली अन ॲकेडमी यांचा समावेश आहे. १८ ऑगस्ट रोजी यातून एकाची निवड होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इतर प्रतिस्पर्धी तुल्यबळ असले तरी टाटा सन्सला प्राधान्य मिळण्याची शक्‍यता आहे. केवळ पैसाच नव्हे तर इतर बाबीही नवा प्रायोजक निवडताना लक्षात घेतल्या जातील, असे बीसीसीआयच्या निविदा अर्जात म्हणण्यात आले आहे. टाटा सन्स क्रिकेटच्या मुख्य प्रायोजकत्वात प्रथमच उतरत असले तरी भारतीय क्रीडा क्षेत्राशी त्यांचे नाते जुने आहे. भारतीय कुस्ती, फुटबॉल आणि टेनिस या प्रमुख खेळांना त्यांनी अगोदरपासूनच आर्थिक साह्य केलेले आहे, हा मुद्दाही टाटा सन्सची दावेदारी अधिक मजबूत करत आहे.

 

आयपीएलबरोबर विवोचा करार असताना ही चिनी मोबाईल कंपनी दरवर्षी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये देत होती. बीसीसीआयने निविदा जाहीर करताना ३०० कोटी ही पायाभूत रक्कम ठेवलेली आहे. टाटा सन्स हे अगोदरपासूनच आयपीएलचे मध्यवर्ती प्रायोजक आहेत, ते ४२ -४५ कोटी मध्यवर्ती प्रायोजकाचे देत आहेत, त्यामुळे मुख्य प्रायोजकत्वासाठी त्यांनी २५० ते २७५ कोटी देण्याची तयारी दाखवल्याचे समजते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या