एटीकेएमबीचा बचाव भेदण्याचे बंगळूरचे लक्ष्य

दैनिक गोमन्तक
रविवार, 20 डिसेंबर 2020

एटीके मोहन बागान (एटीकेएमबी) संघाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत भक्कम बचाव प्रदर्शित केला आहे.

पणजी: एटीके मोहन बागान (एटीकेएमबी) संघाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत भक्कम बचाव प्रदर्शित केला आहे. सोमवारी (ता. 21) त्यांचा बचाव भेदण्याचे लक्ष्य बंगळूर एफसीसमोर असेल.

एटीके मोहन बागान व बंगळूर एफसी यांच्यातील सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. या दोन्ही संघांत सध्या एका गुणाचा फरक आहे. कोलकात्याच्या संघाच्या खाती 13 गुण असून बंगळूरचे 12 गुण आहेत. मागील लढतीत विजयाची नोंद केलेली असल्याने त्यांचा आत्मविश्वासही उंचावलेला असेल.

``हबास यांच्या मार्गदर्शनाखालील संघास बचाव करणे चांगले जमते आणि आक्रमणात कसे धोकादायक ठरायचे हे माहीत आहे. आम्हाला नेमके हे टाळायचे आहे. आम्हाला सामन्यात पुरेशा संधी निर्माण कराव्या लागतील, कारण ते बचावात खूप चांगले आहेत. त्यानी खूप कमी गोल स्वीकारले आहेत,`` असे बंगळूरचे प्रशिक्षक कार्ल्स कुआद्रात यांनी रविवारी सांगितले.

अंतोनियो लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखालील एटीके मोहन बागानने चार सामन्यात क्लीन शीट राखताना सात गोल नोंदविले आहेत. त्यांनी स्पर्धेतील सहा लढतीत आतापर्यंत फक्त तीन गोल स्वीकारले आहेत. गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज याने दोन लढतीतच गोल स्वीकारले आहेत. जमशेदपूरने दोन वेळा त्याचा बचाव भेदला गेला, तर हैदराबादने पेनल्टीवर गोल नोंदविला होता. ``फुटबॉलमध्ये तीन गुणांचीच कल्पना असते, त्यामुळे मी संभाव्य बरोबरी किंवा पराभवाच्या विचाराने खेळत नाही,`` असे हबास यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले. त्याचवेळी प्रत्येक सामना जिंकणेही शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

एटीके मोहन बागानने अगोदरच्या लढतीत एफसी गोवावर मात करून मध्यंतरी घसरलेली कामगिरी सुधारली. बंगळूरने ओडिशा एफसीचे आव्हान मागे सारले. विशेष बाब म्हणजे, कार्ल्स कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखालील बंगळूर संघ स्पर्धेत अपराजित आहे. त्यांनी 11 गोल नोंदविले आहेत. मात्र संघाने सात गोल स्वीकारलेले असल्याने प्रशिक्षक काही प्रमाणात चिंतित असतील.

दृष्टिक्षेपात....

  • - एटीके मोहन बागानच्या रॉय कृष्णाचे 5, मानवीर सिंगचे 2 गोल
  • - बंगळूर एफसीच्या सुनील छेत्री आणि मानवीर सिंगचे प्रत्येकी 3 गोल
  • - गतमोसमात कोलकाता येथे एटीके 1-0 फरकाने विजयी, बंगळूर येथे 2-2 बरोबरी
  • - एटीके मोहन बागानचे यंदा 4 विजय, 1 बरोबरी, 1 पराभव
  • - बंगळूर एफसीचे 3 विजय, 3 बरोबरी

संबंधित बातम्या