ओडिशा संघ प्रशिक्षकाची हकालपट्टी

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात जमशेदपूर एफसीविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिलेले प्रशिक्षक स्टुअर्ट बॅक्स्टर यांची ओडिशा एफसीने हकालपट्टी केली आहे.

पणजी : इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात जमशेदपूर एफसीविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिलेले प्रशिक्षक स्टुअर्ट बॅक्स्टर यांची ओडिशा एफसीने हकालपट्टी केली आहे.

बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर सोमवारी झालेल्या लढतीत जमशेदपूरने ओडिशा एफसीवर एका गोलने विजय मिळविला. त्या सामन्याच्या अंतिम टप्प्यात जमशेदपूरचा गोलरक्षक टीपी रेहेनेश याने ओडिशाच्या दिएगो मॉरिसियो याला पाडल्यानंतर रेफरीने ओडिशा एफसीला पेनल्टी फटका दिला नव्हता. त्या अनुषंगाने पेनल्टी मिळविण्याबाबत सामन्यानंतर बॅक्स्टर यांनी बलात्कारसंदर्भात धक्कादायक प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर ओडिशा एफसीने बॅक्स्टर यांच्या व्यक्तव्याशी क्लब सहमत नसल्याचे निवेदन देत प्रशिक्षकाचे मत स्वीकारार्ह नसल्याचे नमूद केले होते.

ओडिशा एफसी क्लब व्यवस्थापनाने मंगळवारी 67 ब्रिटिश प्रशिक्षक बॅक्स्टर यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जागी बाकी मोसमासाठी अंतरिम मुख्य प्रशिक्षक लवकरच नियुक्त करण्यात येईल असेही क्लबने स्पष्ट केले आहे.  ओडिशा एफसीने 2020-21 मोसमाच्या सुरवातीस बॅक्स्टर यांनी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. बॅक्स्टर यांच्या मार्गदर्शनाखाली भुवनेश्वरस्थित संघाची कामगिरी खराब ठरली. 14 लढतीत त्यांनी फक्त एक सामना जिंकला. पाच बरोबरी व आठ पराभवामुळे केवळ आठ गुणांसह हा संघ 11 संघांच्या आयएसएल स्पर्धेत शेवटच्या क्रमांकावर आहे. त्यांचा पुढील सामना शनिवारी एटीके मोहन बागानविरुद्ध होईल. स्पर्धा सध्या गोव्यात जैवसुरक्षा वातावरणात सुरू आहे.

 
 

संबंधित बातम्या