टिम इंडिया ऑस्ट्रेलियाला व्हॉईटवॉश देणार ? तिसरी टि-ट्वेंटी आज

गोमन्तक
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्‌वेन्टी-२० मालिका जिंकली असली, तरी भारतीय संघ कसोटी मालिकेपूर्वी आत्मविश्‍वास अधिक बळकट करण्यासाठी आजचा तिसरा आणि अखेरचा ट्‌वेन्टी-२० सामना जिंकून कांगारूंना त्याच्याच देशात व्हॉईटवॉशची संधी सोडणार नाही.

सिडनी  :  ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्‌वेन्टी-२० मालिका जिंकली असली, तरी भारतीय संघ कसोटी मालिकेपूर्वी आत्मविश्‍वास अधिक बळकट करण्यासाठी आजचा तिसरा आणि अखेरचा ट्‌वेन्टी-२० सामना जिंकून कांगारूंना त्याच्याच देशात व्हॉईटवॉशची संधी सोडणार नाही. २०१६ ची पुनरावृत्ती करण्याचीही ही संधी आहे.

२०१६ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने ट्‌वेन्टी-२० मालिका ३-० अशी जिंकली होती. तो इतिहास उद्या पुन्हा घडण्याची शक्‍यता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निर्भेळ यश मिळवल्यानंतर आत्मविश्‍वासाचा फायदा भारतीय संघाला कसोटी मालिकेसाठी फायदेशीर ठरू शकतो. ऑस्ट्रेलियात आल्यानंतर पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांत झालेल्या मोठ्या पराभानंतर भारतीय संघ चांगलाच सावरला आहे. गोलंदाजीत सुधारणा झाली आहे; तसेच फलंदाजही निर्णायक योगदान देत आहेत. भारताला विजयीपथावर ठेवणारा रवींद्र जडेजा अनुपलब्ध असला, तरी भारतीय संघाची विजयी लय कायम राहिली आहे. 

 

मॅचविनर नटराजन

गोलंदाजीची प्रमुख मदार असलेल्या जसप्रित बुमरा आणि महम्मद शमी (पहिल्या ट्‌वेन्टी-२० चा अपवाद) यांच्याशिवाय भारतीय संघ जिंकत आहे. नटराजनच्या रूपाने भारताला मॅचविनर मिळाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो तीन सामने खेळला (एक वनडे, दोन टी-२०) हे तिन्ही सामने भारताने जिंकलेले आहेत. रविवारच्या सामन्यात एकीकडे इतर गोलंदाज धावा देत असताना नटराजनने चार षटकात अवघ्या एका चौकारासह २० धावाच दिल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची धावसंख्या द्विशतक गाठू शकली नाही.

 

अगरवालला संधी मिळणार

एरवी विजयी संघात भारतीय बदल करत नाहीत. तसेच आता राखीव खेळाडूंनाही संधी मिळालेली आहे. अपवाद आहे मयांक अगरवालचा. केएल राहुल कसोटी मालिकेसाठी महत्त्वाचा खेळणार असणार आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी अगरवालला संधी मिळू शकते. संजू सॅसमन संघात असल्यामुळे यष्टिरक्षणाचा प्रश्‍न सुटणार आहे.

 

लक्ष्य ऑस्‍ट्रेलिया

  • आज तिसरी ट्‌वेंटी २० लढत
  • ठिकाण - सिडनी क्रिकेट ग्राऊंड, सिडनी
  • थेट प्रक्षेपण -  दुपारी १.४०
  • हवामानाचा अंदाज - दक्षिणेकडून जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाल्यामुळे थंड वातावरणात लढत अपेक्षित
  • खेळपट्टीचा अंदाज - खेळपट्टी फलंदाजीसाठी पूर्णपणे अनुकूल, पण हवामान गोलंदाजीसाठी पोषक असण्याची चिन्हे.

 

अधिक वाचा :

एटीके मोहन बागानची आयएसएलमधील अपराजित मालिका खंडित ; व्हॅल्सकिसमुळे जमशेदपूरची सनसनाटी

संबंधित बातम्या