ऑस्ट्रेलिया दौरा फत्ते केल्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची निवड

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 19 जानेवारी 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका टीम इंडियाने आपल्या खिशात घातली. कांगारूंसोबतच्या अंतिम सामन्यात तीन विकेट्स राखून भारतीय संघाने कसोटी मालिका 2 - 1 ने आपल्या नावावर केली. त्यानंतर आता भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका टीम इंडियाने आपल्या खिशात घातली. कांगारूंसोबतच्या अंतिम सामन्यात तीन विकेट्स राखून भारतीय संघाने कसोटी मालिका 2 - 1 ने आपल्या नावावर केली. त्यानंतर आता भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा आज झाली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने संघाची घोषणा केली असून, यात विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि ईशांत शर्मा यांनी पुनरागमन केले आहे. 

ऑस्ट्रेलिया सोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेसाठी मायदेशी परतला होता. मात्र त्यानंतर आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतून विराट पुन्हा मैदानात उतरणार आहे. याशिवाय ईशांत शर्मा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकला नव्हता. पण त्यानंतर इशांतने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत उतरत दर्जेदार कामगिरी केली आहे. आणि या पार्श्वभूमीवर इशांत शर्माने पुन्हा संघात प्रवेश केला आहे. तर हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेनंतर भारतात परतला होता. परंतु आता हार्दिक पांड्याही इंग्लंड बरोबरच्या कसोटी मालिकेत खेळणार आहे. 

याशिवाय फिरकीपटू अक्षर पटेलला आगामी इंग्लंडसोबतच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध पदार्पण केलेल्या टी नटराजनला वगळण्यात आले आहे. तसेच पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी यांना देखील इंग्लंड विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात बाहेर बसवण्यात आले आहे. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज व शार्दुल ठाकुर यांचे संघातील स्थान कायम आहे. त्यानंतर, प्रियांक पांचाळ, केएस भारत, अभिमन्यु एस्वरन, शाहबाज नदीम आणि राहुल चाहर या पाच जणांना अतिरिक्त खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंकित राजपूत, अवेश खान, संदीप वॉरियर, के गौथम आणि सौरभ कुमार यांना नेट गोलंदाज म्हणून निवडण्यात आले आहे.   

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने चेन्नई मध्ये खेळवण्यात येणार आहेत. तर उर्वरित दोन सामने अहमदाबादच्या नवीन सरदार वल्लभभाई पटेल (मोटेरा) आंतराराष्ट्रीय स्टेडियम वर होणार आहेत. पाच फेब्रुवारी पासून इंग्लंड सोबतची ही मालिका सुरु होणार आहे. 

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, केएल राहुल, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, आर अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल     

संबंधित बातम्या