INDvsENG 2ndT Day2: टीम इंडिया मजबूत स्थितीत; अश्विनच्या फिरकीमुळे इंग्लंडचे फलंदाज गारद 

INDvsENG 2ndT Day2: टीम इंडिया मजबूत स्थितीत; अश्विनच्या फिरकीमुळे इंग्लंडचे फलंदाज गारद 
Copy of Gomantak Banner - 2021-02-14T182202.604.jpg

भारत आणि इंग्लंड यांच्यात होत असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्याचा आजचा दुसरा दिवस संपलेला असून, भारतीय संघाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने पहिल्या डावात 329 धावा केलेल्या आहेत. तर पाहुण्या इंग्लंडच्या संघाला पहिल्या डावात 134 धावाच करता आलेल्या आहेत. आणि त्यामुळे भारतीय संघाला दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात 195 धावांनी बढत मिळाली आहे. याशिवाय दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेंव्हा भारतीय संघाने एक गडी गमावत 54 धावा केलेल्या आहेत. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने केलेली दमदार दीड शतकीय व अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यांच्या अर्धशतकीय खेळीमुळे भारतीय संघाला पहिल्या डावात 329 धावसंख्या उभारता आली. हिटमॅन रोहित शर्माने 231 चेंडूंचा सामना करत, 2 षटकार आणि 18 चौकरांच्या मदतीने 161 धावा केल्या. याशिवाय, उपकर्णधार अजिंक्य रहाणेने 149 चेंडूंचा सामना करताना 67 धावा केल्या. तर रिषभ पंतने 77 चेंडू खेळताना 58 धावा केल्या. 

पहिल्या डावात भारताने 329 धावसंख्या उभारल्यानंतर पाहुणा इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. परंतु भारतीय गोलंदाजांनी केलेल्या धारदार आणि अचूक गोलंदाजीमुळे इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 134 धावांवर आटोपला.  इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्सला इशांत शर्माने खातेही  उघडू दिले नाही. रोरी बर्न्सला इशांत शर्माने शून्य धावांवर पायचीत केले. त्यानंतर डॉम सिब्लेला रविचंद्रन अश्विनने 16 धावांवर बाद करून भारतीय संघाला दुसरे यश मिळवून दिले. अश्विनने त्याला विराट कोहली करवी झेलबाद केले. 

त्यानंतर मागील सामन्यात धमाकेदार कामगिरी करणाऱ्या जो रूटला अक्षर पटेलने झेलबाद करून भारतीय संघाला तिसरी विकेट मिळवून दिली. जो रूट फक्त सहा धावांवर असताना अश्विनने त्याचा झेल पकडला. पुढे लॉरेन्सला अश्विनने 9 धावांवर शुभमन गिल करवी झेलबाद केले. यानंतर बेन स्टोक्स 18 धावांवर असताना अश्विनने त्याला बोल्ड केले. तर ओली पोपला मोहम्मद सिराजने बाद केले. पोप 22 धावांवर असताना मोहम्मद सिराजने त्याला रिषभ पंत करवी झेलबाद केले. पोप आऊट झाल्यानंतर इंग्लंड संघाचे उर्वरित खेळाडू झटपट बाद झाले. मात्र बेन फॉक्स नाबाद राहिला. त्याने 107 चेंडूंचा सामना करत एका चौकारासह 42 धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या डावातच इंग्लंडच्या संघावर आघाडी मिळवली आहे. 

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला होता. पाहुण्या इंग्लंडच्या संघाने भारताला या सामन्यात तब्बल 277 धावांनी हरवले होते. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाने 578 धावांचा डोंगर उभा केला होता. आणि भारतीय संघाने पहिल्या डावात 337 धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या संघाला 178 धावांवर रोखले होते. आणि त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी 420 धावांचे लक्ष्य मिळाले होते. परंतु, दुसऱ्या डावात भारतीय संघ 192 धावांवर आटोपल्याने टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला होता.   

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com