टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचा क्रिकेटला अलविदा

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021


भारतीय संघातील दोन खेळाडूंनी आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती स्वीकारली आहे. 

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. बर्‍याच दिवसांपासून भारतीय संघाबाहेर असलेल्या युसूफ पठाणला मागील वर्षाच्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. त्यानंतर आता युसूफ पठाणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. युसूफ पठाणने सोशल मीडियावरील ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती जाहीर केली. त्यानंतर भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज विनय कुमारने देखील आजच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे.   

युसूफ पठाणने आपल्या ताबडतोब तुफानी फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले होते. युसूफ पठाणने 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धतुन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आणि 2008 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून एकदिवसीय क्रिकेट प्रकारात प्रवेश केला होता. व 2012 मध्ये भारतीय संघाकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. आपल्या कारकिर्दीत युसूफ पठाणने भारतीय संघाकडून 57 एकदिवसीय आणि 22 टी-ट्वेन्टी सामने खेळले. यात एकदिवसीय प्रकारात युसूफ पठाणने दोन शतकांच्या जोरावर 810 धावा केलेल्या आहेत. आणि 33 विकेट त्याने मिळवल्या आहेत. तर टी-ट्वेन्टी मध्ये 236 धावा आणि 13 बळी युसूफ पठाणच्या नावावर आहेत. 

INDVsENG : इंग्लंड दोनच दिवसात हरल्यामुळे केविन पीटरसन भडकला; म्हणाला..

युसूफ पठाणचा लहान भाऊ इरफान पठाणने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. तर आज युसूफ पठाणने सोशल मीडियावरील ट्विटरवरून आपण निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. युसूफ पठाणने केलेल्या या ट्विट मध्ये कुटुंबातील सदस्य, सहकारी, चाहते, संघ, प्रशिक्षक आणि सर्व देशवासीयांचे आभार मानले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अशोक दिंडाने देखील आंतराराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते.  

युसूफ पठाण नंतर वेगवान गोलंदाज विनय कुमारने आपली 17 वर्षांची क्रिकेट कारकीर्द संपविण्याची घोषणा केली आहे. गोलंदाजी करताना भारताकडून एकदिवसीय, कसोटी, टी-ट्वेन्टी आणि स्थानिक क्रिकेट मध्ये मिळून 900 हून अधिक बळी विनय कुमारने मिळवले आहेत. एकट्या स्थानिक क्रिकेट मधेच त्याने  504 विकेट घेतलेल्या आहेत. विनय कुमारने देखील आज सोशल मीडियावरील ट्विटरच्या माध्यमावरून आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. 

विनय कुमारने 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते. तर 2013 मध्ये शेवटचा सामना खेळला होता. याशिवाय 2010 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून टी-ट्वेन्टी क्रिकेट मध्ये प्रवेश केला होता. भारतासाठी या गोलंदाजाने 31 एकदिवसीय, 9 टी-ट्वेन्टी आणि एक कसोटी सामना खेळला आहे. आणि एकदिवसीय क्रिकेट प्रकारात 38, टी-ट्वेन्टी मध्ये 10 आणि कसोटीत 1 विकेट त्याच्या नावावर आहे.     

संबंधित बातम्या