
गोव्याचा अव्वल मानांकित पुरुष टेनिसपटू तेजस शेवडे याने पुरुष एकेरी व मिश्र दुहेरीत शानदार खेळ करताना बीपीएस अखिल गोवा राज्य मानांकन टेनिस स्पर्धेत विजेतेपदाची ‘डबल’ किमया साधली. ज्युनियर मुलींत दबदबा राखताना तिथी भूमकर हिने 14 वर्षांखालील व 18 वर्षांखालील मुलींत एकेरीत बाजी मारत दुहेरी किताब पटकावला.
स्पर्धेतील अंतिम सामने मडगाव येथील बीपीएस क्लब टेनिस कोर्टवर झाले. तेजसने पुरुष एकेरीतील अंतिम लढतीत एकही गेम न गमावता राजाराम कुंडईकर याचा 6-0, 6-0 असा धुव्वा उडविला.
राजाराम याची राज्य मानांकन पातळीवरील ही पहिलीच अंतिम लढत होती. तेजसने मिश्र दुहेरीत स्टॅनिया पेरिस हिच्या साथीत खेळताना अंतिम लढतीत जस्मीत सिंग व प्रणिता पेडणेकर जोडीस 6-1, 6-0 असे नमविले.
राजारामने पुरुष दुहेरीत जेतेपदाचा करंडक पटकावताना संतोष गोरावर याच्या साथीत प्रिन्स आग्नेल डिसिल्वा व संदेश सातार्डेकर जोडीस ६-३, ६-० असे हरविले. तिथी हिने १४ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत आपली मैत्रीण विधी नाईक हिला पहिला सेट गमावल्यानंतर १-४, ४-२, ४-२ असे नमविले. या दोघींतच १८ वर्षांखालील वयोगटातील अंतिम लढत झाली. हा सामना एकतर्फी ठरवताना तिथी हिने ६-०, ६-२ असा विजय संपादन केला.
सिमरन, दर्श, पुनीत यांनाही जेतेपद
महिला एकेरीत सिमरन बुंदेला विजेती ठरली. अंतिम सामन्यात तिने प्रणिता पेडणेकर हिला ४-१, ४-१ असे नमविले. १४ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत दर्श पै याने विजेतेपद प्राप्त केले. त्याने व्हिवान अगरवाल याला ४-०, ४-० असे लीलया हरविले. मात्र दर्श याला १८ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत
उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पुनीत फडते याने या वयोगटात बाजी मारताना ६-१, ६-० असा विजय झळकावला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.