टेनिस, स्क्वॉश कोर्ट ऑगस्टपर्यंत पूर्ण

tennis court
tennis court

सासष्टी

फातोर्डा येथील लॉन टेनिस कोर्ट आणि चिखली-वास्को येथील स्क्वॉश कोर्ट प्रकल्पाचे काम येत्या ऑगस्टअखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक लोटलीकर यांनी दिली. बेमुदत लांबणीवर टाकण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनिमित्त दोन्ही खेळांच्या कोर्टची बांधणी होत आहे.
लॉन टेनिस कोर्ट व स्क्वॉश कोर्टचे काम कोरोना विषाणू महामारी लॉकडाऊनमुळे रखडले होते, आता दोन्ही प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहे, असे लोटलीकर यांनी सांगितले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन समितीची बैठक सप्टेंबरमध्ये होणार आहे, त्यापूर्वीच हे दोन्ही प्रकल्प तयार होतील, असा विश्वास लोटलीकर यांनी व्यक्त केला.

लॉन टेनिससाठी चार कोर्ट
अगोदरच्या नियोजनानुसार, फातोर्डा येथे तीन टेनिस कोर्ट होणार होते, पण, राष्ट्रीय स्पर्धा क्रीडा समितीने आणखी एक कोर्टची मागणी केल्यामुळे तिथे चार कोर्ट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन कोर्ट उभारण्यात येणार असल्यामुळे यावर तीन कोटी रुपये खर्च होणार होते, परंतु हा आकडा आता सुमारे साडेतीन कोटी रुपयांवर पोहचला असून प्रकल्प उभारण्यासाठी वेळही जास्त लागलेला आहे, अशी माहिती लोटलीकर यांनी दिली. चिखली येथील स्क्वॉश कोर्ट प्रकल्पाच्या बांधकामास कंत्राटदारामुळे विलंब झाला, तसेच लॉकडाऊनचाही फटका बसला, असे त्यांनी स्पष्ट केले.

७० कोटींचे अंदाजपत्रक
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोवा क्रीडा प्राधिकरणातर्फे दक्षिण गोव्यात उभारण्यात येणाऱ्या पाच प्रकल्पांवर सुमारे ७० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यात स्क्वॉश कोर्टसाठी ६ कोटी, नावेली इनडोअर स्टेडियमसाठी ४३ कोटी, फोंडा इनडोअर क्रीडा संकुलासाठी १० कोटी, मल्टिपर्पज सभागृहासाठी ६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या पाच प्रकल्पापैकी स्क्वॉश कोर्ट आणि लॉन टेनिस वगळल्यास इतर प्रकल्पाचे बांधकाम पूर्णत्वास आलेले आहे, असे लोटलीकर यांनी सांगतले. नावेली इनडोअर स्टेडियमचे काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी हँडबॉल, खो-खो आणि कबड्डी आदी खेळ खेळविण्यात येतील, मल्टिपर्पज सभागृहात सेपॅक टॅकरो आणि वुशू, फोंडा क्रीडा संकुलात तायक्वांदो व ज्युडो खेळ होतील, अशी माहिती लोटलीकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com