माजी बंगळूर एफसीच्या पराभवाचे मुख्य कारण बनले सुपरस्टार खेळाडूचे अपयश

अनुभवी स्ट्रायकर सुनील छेत्री (Sunil Chhetri) याचा पेनल्टी फटका ओडिशा एफसी गोलरक्षक कमलजित सिंग याने अचूक अंदाज बांधत अडविला.
Bangalore FC
Bangalore FCDainik Gomantak

पणजी: अनुभवी स्ट्रायकर सुनील छेत्री (Sunil Chhetri) याचा पेनल्टी फटका ओडिशा एफसी गोलरक्षक कमलजित सिंग याने अचूक अंदाज बांधत अडविला. सुपरस्टार खेळाडूचे अपयश माजी विजेत्या बंगळूर एफसीच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेत गतमोसमात तळाच्या अकराव्या स्थानी राहिलेल्या भुवनेश्वरच्या संघाने 3-1 फरकाने सामने जिंकत स्पर्धेच्या आठव्या मोसमातील मोहिमेची सुरवात विजयाने केली.

वास्को टिळक मैदानावर झालेल्या लढतीत स्पॅनिश खेळाडू हावियर हर्नांडेझ ओडिशाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याच्या दोन गोलमुळे किको रमिरेझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने पहिल्याच लढतीत पूर्ण तीन गुणांची कमाई केली. हर्नांडेझने पहिला गोल तिसऱ्या मिनिटास केला, नंतर 51व्या मिनिटास थेट फ्रीकिकवर संघाला आघाडी मिळवून दिली. 90+4व्या मिनिटास बदली खेळाडू स्पॅनिश अरिदाई सुवारेझ याने ओडिशाच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदविला. त्यापूर्वी 21व्या मिनिटास ब्राझीलियन खेळाडू ॲलन कॉस्ता याने हेडिंगद्वारे बंगळूरला बरोबरी साधून दिली होती. मार्को पेझ्झैयोली यांच्या मार्गदर्शनाखालील बंगळूरचा हा दोन लढतीतील पहिला पराभव असून त्यांचे तीन गुण कायम राहिले.

पेनल्टीवर छेत्रीचा नेम चुकला

भारताचा कर्णधार, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 80 गोल करणारा हुकमी स्ट्रायकर सुनील छेत्री बुधवारी पेनल्टी फटका मारताना अचूक नेम साधू शकला नाही. ओडिशा एफसीच्या हेंड्री अंतोनेय याने वेगवान चालीत बंगळूरच्या क्लेटन सिल्वा याला गोलक्षेत्रात पाडले. रेफरी आर. व्यंकटेश यांनी पेनल्टी फटक्याची खूण केल्यानंतर 62व्या मिनिटास छेत्रीच्या फटक्यावर गोलरक्षक कमलजित सिंगने अचूक अंदाज बांधला आणि उजवीकडे झेपावत चेंडू अडविला. यावेळी सिल्वा याने रिबाऊंडवर केलेला गोल रेफरीने नाकारला, त्यामुळे बंगळूरला बरोबरी साधता आली नाही. पेनल्टी फटका रोखला गेल्यामुळे आयएसएल स्पर्धेत सर्वाधिक 48 गोल केलेल्या फेरान कोरोमिनास याला गाठण्यासाठी छेत्रीस प्रतीक्षा करावी लागली.

केरळा, नॉर्थईस्ट विजयासाठी प्रयत्नशील

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गुरुवारी (ता. 25) केरळा ब्लास्टर्स व नॉर्थईस्ट युनायटेड स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील असतील. स्पर्धेतील पहिल्या लढतीत केरळा ब्लास्टर्सला एटीके मोहन बागानकडून, तर नॉर्थईस्टला बंगळूरकडून समान 2-4 फरकाने पराभव पत्करावा लागला होता.

हर्नांडेझचा अफलातून खेळ

स्पॅनिश हावियर हर्नांडेझ याच्या अफलातून खेळामुळे ओडिशाला बंगळूरवर वर्चस्व राखता आले. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटास गोलरक्षक गुरप्रीत संधू याचा अतिआत्मविश्वास बंगळूरला नडला. अनुभवी गोलरक्षकाने आपली जागा सोडत मारलेल्या किकवर चेंडू थेट हर्नांडेझकडे गेला. 32 वर्षीय स्पॅनिश खेळाडूने आयती संधी साधली. नेटसमोर कोणीही नसल्याचे हेरताना उंचावरून चेंडू मारत गोलची नोंद केली. विश्रांतीनंतरच्या सहाव्या मिनिटास हर्नांडेझने थेट फ्रीकिकवर गोलरक्षक गुरप्रीतला अजिबात संधी दिली नाही, त्यामुळे ओडिशाला 2-1 अशी आघाडी प्राप्त झाली. त्यापूर्वी 21व्या मिनिटास ब्राझीलियन ॲलन कॉस्ता याने कॉर्नरवरील फटक्यावर भेदक हेडिंग साधल्यामुळे बंगळूरला बरोबरीचा आनंद मिळाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com