तर गोव्याचे रणजी सामने घटणार

Dainik Gomantak
गुरुवार, 28 मे 2020

रणजी स्पर्धेची रचना बदलण्याचा प्रस्ताव बीसीसीआयच्या विचाराधीन येऊ शकतो. या नव्या प्रस्तावानुसार स्पर्धा खेळली गेल्यास रणजी करंडक स्पर्धेतील सामने कमी होतील.

पणजी 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी देशांतर्गत क्रिकेट मोसमात प्रतिष्ठेच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे स्वरूप बदलल्यास, गोव्यासह स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व संघांच्या मोसमातील सामन्यांत घट संभव आहे.

 

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची रचना बदलण्याचे वृत्त राष्ट्रीय दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर, बीसीसीआयचे सरव्यवस्थापक (क्रिकेट ऑपरेशन्स) साबा करीम यांनी वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना संबंधित वृत्त नाकारले. तसा प्रस्ताव पाठविण्यात आला नसल्याचे करीम यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

कोरोना विषाणू महामारीचा देशव्यापी प्रादुर्भाव वाढत आहे. या महामारी साथीवर अजून औषध-लस आलेली नाही. त्यामुळे धोका कायम आहे. केंद्र सरकारने देशात मार्गदर्शक तत्त्वांसह सराव शिबिरे सुरू केली असली, तरी अजून स्पर्धा घेण्यास मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे बीसीसीआयचा देशांतर्गत क्रिकेट मोसम कधीपासून सुरू होईल याबाबत स्पष्टता नाही.

राष्ट्रीय दैनिकातील वृत्तानुसार, रणजी स्पर्धेची रचना बदलण्याचा प्रस्ताव बीसीसीआयच्या विचाराधीन येऊ शकतो. या नव्या प्रस्तावानुसार स्पर्धा खेळली गेल्यास रणजी करंडक स्पर्धेतील सामने कमी होतील. सध्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत एलिट अ व ब गटात प्रत्येकी नऊ असे एकूण १८, एलिट क गटात १०, तर प्लेट गटात १० असे एकूण ३८ संघ खेळतात. नव्या रचनेनुसार एलिट गट पाच गटात विभागून प्रत्येक गटात ६ असे एकूण ३० संघ असतील. प्लेट गट ८ संघांचा असेल.

 ...तर गटसाखळीत ५ सामने

वृत्तानुसार नवा प्रस्ताव मान्य होऊन रणजी स्पर्धेची रचना बदलली गेल्यास, प्रत्येक गटात सहा संघ असल्यामुळे एलिट गटसाखळी फेरीत एक संघ पाच सामने खेळेल. पूर्वनियोजनानुसार, गोवा २०२०-२१ मोसमातील रणजी एलिट क गटसाखळी फेरीत ९ सामने खेळणे अपेक्षित आहे. नव्या प्रस्तावानुसार गटसाखळीत संघांचे सामने कमी झाल्यास, खेळाडूंना आर्थिक तोटाही सहन करावा लागेल. सध्या प्रत्येक चार दिवसीय सामन्यासाठी रणजीपटूस अंदाजे १.४ लाख रुपये मिळतात.

 गोव्याची यापूर्वीची रणजी मोहीम...

- १९८५-८६ ते २००१-०२ पर्यंत दक्षिण विभागात प्रत्येक मोसमात प्रत्येकी ५ सामने

- २००२-०३ ते २०११-१२ पर्यंत प्लेट गटसाखळीत प्रत्येक मोसमात प्रत्येकी ५ सामने

- २००८-०९ मोसमात प्लेट गटाची उपांत्य फेरी गाठण्यामुळे ६ सामने

- २०१२-१३ ते २०१५-१६ मोसमात प्रत्येकी ८ सामने

- २०१७-१८ मोसमात ६ सामने

- २०१६-१७ व २०१८-१९ मोसमात प्रत्येकी ९ सामने

- २०१९-२० मोसमात प्लेट गटात ९ आणि उपांत्यपूर्व सामना मिळून एकूण १० सामने

संबंधित बातम्या