INDvsENG : जोस बटलरच्या अर्धशतकीय खेळीमुळे पाहुण्या इंग्लंडचा टीम इंडियावर विजय 

England
England

भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेनंतर पाच सामन्यांची टी-ट्वेन्टी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील तिसरा सामना आज अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात पाहुण्या इंग्लंडच्या संघाने भारतीय संघावर विजय मिळवला आहे. आणि त्यासोबतच इंग्लंडने मालिकेत 2 - 1 ने बढत मिळवली आहे. आज झालेल्या तिसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना सहा विकेट गमावत 156 धावा केल्या होत्या. मात्र इंग्लंडच्या संघाने दमदार कामगिरी करत टीम इंडियाने दिलेले लक्ष्य सहज गाठले. आणि सामना आपल्या खिशात घातला. 

इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने केलेल्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 157 धावांचे लक्ष्य इंग्लंड समोर ठेवले होते. भारतीय संघाला आज फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यावर के एल राहुलच्या रूपात पहिला धक्का बसला. के एल राहुलला मार्क वुडने खातेही खोलू न देता माघारी धाडले. त्यानंतर हिटमॅन रोहित शर्माला देखील मार्क वुडने बाद केले. रोहित शर्मा 15 धावांवर जोफ्रा आर्चरकडे झेल देत बाद झाला. यानंतर मागील सामन्यात दमदार अर्धशतक झळकावणाऱ्या ईशान किशनला ख्रिस जॉर्डनने जोस बटलर करवी झेलबाद केले. ईशान किशन अवघ्या चार धावांवर बाद झाला. 

ईशान किशननंतर कर्णधार विराट कोहली आणि रिषभ पंत यांनी पडझड रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र रिषभ पंतला जोस बटलरने धावबाद केले. रिषभ पंत 25 धावांवर बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यरला देखील मार्क वुडने फार वेळ मैदानावर टिकू दिले नाही. श्रेयस अय्यर धावांवर असताना मार्क वुडने त्याला डेव्हिड मलनकडे झेलबाद केले. तर अष्टपैलू हार्दिक पांड्या देखील यावेळेस कोणती कमाल दाखवू शकला नाही. हार्दिक पांड्याला ख्रिस जॉर्डनने जोफ्रा आर्चरकडे झेलबाद केले. हार्दिक पांड्याने 15 चेंडूंचा सामना करताना दोन उत्तुंग षटकारांच्या जोरावर 17 धावा केल्या. मात्र कर्णधार विराट कोहलीने आज मैदानावर टिकून राहत नाबाद अर्धशतकीय खेळी केली. विराट कोहलीने 46 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर नाबाद 77 धावा केल्या.

यानंतर, भारतीय संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरवात देखील म्हणावी तशी झाली नाही. इंग्लंड संघाचा सलामीवीर जेसन रॉयला युझवेंद्र चहलने 9 धावांवर रोहित शर्माकडे झेलबाद केले. मात्र त्यानंतर जोस बटलर आणि डेव्हिड मलन यांनी अर्धशतकीय भागीदारी करत संघाला सावरले. इंग्लंडची धावसंख्या 81 असताना वॉशिंग्टन सुंदरने डेव्हिड मलनला 18 धावांवर झेलबाद केले. पण जोस बटलरने मैदानात पाय रोवत इंग्लंडच्या संघाचा विजय सुककर केला. जोस बटलरने 52 चेंडूंचा सामना करताना नाबाद 83 धावा केल्या. यासोबतच जॉनी बेअरस्टोने 40 धावा केल्या. इंग्लंड संघाकडून सर्वाधिक विकेट्स मार्क वुडने घेतल्या. त्याने तीन बळी टिपले. त्यानंतर ख्रिस जॉर्डनने दोन विकेट्स घेतल्या. तर भारतीय संघाकडून युझवेंद्र चहलने आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी एक एक विकेट्स घेतल्या.                           

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com