थॉमस-उबर करंडक बॅडमिंटन लांबणीवर

वार्ताहर
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

सर्व संघ माघार घेत असल्याने फेडरेशनचा निर्णय

नवी दिल्ली: एकेक करून प्रमुख देश माघार घेत असल्यामुळे डेन्मार्कमध्ये होणाऱ्या थॉमस आणि उबर कप बॅडमिंटन स्पर्धा पुढील वर्षापर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही स्पर्धा ३ ते ११ ऑक्‍टोबरदरम्यान होणार होती. 

कोरोनाचे आक्रमण सुरू झाल्यानंतर मार्चपासून कोणतीही आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा झालेली नाही. थॉमस आणि उबर कप स्पर्धेद्वारे बॅडमिंटनचे पुनरागमन होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. डेन्मार्कने या स्पर्धेची तयारीही सुरू केली होती; परंतु इंडोनेशिया, दक्षिण कोरिया त्याअगोदर थायलंड, ऑस्ट्रेलिया, तैपेई आणि अल्जेरिया या देशांनी माघार घेतल्यानंतर जागतिक बॅडमिंटन संघटनेने ही स्पर्धा किमान २०२० पर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. 

जागतिक संघटनेने सिंगापूर आणि हाँगकाँग यांच्याकडे पर्याय म्हणून पाहिले जात होते; परंतु त्यांनीही स्पर्धा आयोजनास नकार दिला. जपानही या स्पर्धेतून माघार घेण्याचा विचार करत होता. त्याचबरोबर चीन संघाला सहभागासाठी त्यांच्या सरकारने हिरवा कंदील दिला नव्हता.

भारताने मात्र या स्पर्धेत खेळण्याची मानसिक तयारी केली होती. संघही निवडण्यात आले होते. जागतिक विजेती पी. व्ही. सिंधू या स्पर्धेत खेळणार नव्हती; परंतु बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षांनी तिला विनंती केली होती. एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरी फुलराणी साईना नेहवालने मात्र या स्पर्धेत खेळणे किती सुरक्षित आहे, असे दोन दिवसांपूर्वीच म्हटले होते.

बॅडमिंटनमधील ही प्रतिष्ठेची स्पर्धा सुरक्षित वातावरणात खेळवण्यासाठी आम्ही सर्व तयारी करत होतो. बायो बबल वातावरणही तयार करत होतो; परंतु सहभागी राष्ट्रांच्या संघांच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, असे जागितक बॅटमिंटन संघटनेने स्पष्ट केले.

डेन्मार्क ओपन मात्र होणार
राष्ट्रीय संघांमध्ये होणाऱ्या थॉमस-उबर करंडक स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी डेन्मार्कमध्येच होणारी डेन्मार्क ओपन स्पर्धा मात्र १३ ते १८ ऑक्‍टोबर या नियोजित काळात होणार असल्याचा निर्णय जागतिक बॅडमिंटन फेडरेशनने घेतला आहे.

विमल कुमार यांची टीका
आशियाई देशांच्या नकार्तेपणामुळे ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली आहे, अशी टीका भारताचे माजी प्रशिक्षक विमल कुमार यांनी केली. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्राला हा मोठा धक्का असल्याचेही ते म्हणाले . भारताचे विद्यमान प्रशिक्षक गोपीचंद यांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले.
 

संबंधित बातम्या