अमेरिकन ओपन: अव्वल मानांकित करोलिना प्लिस्कोवाचा पराभव

वृत्तसेवा
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला विभागात धक्कादायक निकालाची नोंद झाली. अव्वल मानांकित करोलिना प्लिस्कोवाला दुसऱ्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाने प्लिसकोवाचा ६-१. ७-६ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.

न्यूयॉर्क: अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला विभागात धक्कादायक निकालाची नोंद झाली. अव्वल मानांकित करोलिना प्लिस्कोवाला दुसऱ्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाने प्लिसकोवाचा ६-१. ७-६ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.

३० मिनिटे चाललेल्या या सामन्यात माजी नंबर वन महिला टेनिसपटू असलेल्या प्लिस्कोवाकडे उत्तर नव्हते. पहिल्याच सेटमध्ये प्लिस्कोवा ०-५ असे पिछाडीवर पडली तेथेच सामन्याचा निकाल स्पष्ट होत होता. दुसऱ्या सेटमध्ये मात्र तिने थोडासा लौकिक कायम ठेवत हा सेट टायब्रेकरपर्यंत लांबवला, परंतु टायब्रेकरमध्ये तिला दोनच गुण मिळवता आले.

गार्सियाचा तिसऱ्या फेरीत सामना अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडीशी होणार आहे. प्लिस्कोवाने प्रतिस्पर्धी गार्सियाचे या विजयाबद्दल अभिनंदन केले. खरे तर आपले लक्ष क्‍ले कोर्टवर होणाऱ्या फ्रेंच स्पर्धेकडे लागलेले आहे आणि त्यादृष्टीने तयारीही करत असल्याचे सांगितले. प्लिस्कोवाच्या या पराभवामुळे अव्वल मानांकित खेळाडूचा दुसऱ्या फेरीत पराभव होण्याची घटना दोन वर्षांनंतर घडली आहे. २०१८ मध्ये अव्वल मानांकित सिमोनो हलापचा दुसऱ्या फेरीत पराभव झाला होता.

जोकोविच विजयी
अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविचने पहिला सेट टायब्रेकरमध्ये गमावल्यावर विजय मिळवता आला. त्याने ब्रिटनच्या काईल एडमंडवर ६-७, ६-३, ६-४, ६-२ असा विजय मिळवला. अमेरिकन स्पर्धेतील हा त्याचा २५ वा विजय आहे.

पाचव्या मानांकित ॲलेक्‍झांडर झ्वेरेवने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळालेल्या अमेरिकेच्या ब्रॅंडन नाकाशिमावर ७-५, ६-७, ६-३, ६-१ अशी मात केली. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असणाऱ्या झ्वेरेवने २४ बिनतोड सर्व्हिस केल्या असल्या, तरी त्याच्याकडून तेवढ्याच दुहेरी चुका झाल्या होत्या.

संबंधित बातम्या