गोव्यासमोर रणजी क्रिकेट मोहिमेत तगडे आव्हान

किशोर पेटकर
शनिवार, 9 मे 2020

कोरोना विषाणू महामारीमुळे लॉकडाऊन असल्याने खेळाडू मैदानापासून दूर आहेत. कोविड-१९ वर अंकुश आल्यानंतर केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतरच सराव शिबिरे, स्पर्धा आदींना प्रारंभ होईल. रणजी क्रिकेट स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबरपासून खेळली जाऊ शकते.

पणजी,

गोव्याने गतमोसमातील रणजी करंडक क्रिकेट मोहिमेत कमजोर संघांच्या प्लेट गटात ९ पैकी ७ सामने जिंकले, पण उपांत्यपूर्व लढतीत बलाढ्य गुजरातविरुद्ध डाळ शिजली नाही. पराभवासह अपराजित मालिका खंडित झाली. नव्या मोसमात जास्त विजयांची संधी कमीच असेल, तगड्या संघाविरुद्धची मोहीम आव्हानात्मक आणि खडतर संभवते.

गोव्याने १९८५-८६ पासूनच्या द्विशतकी रणजी सामन्यांच्या मोहिमेत २७ सामने जिंकले आहेत. त्यापैकी ७ विजय गतमोसमातच मिळाले, पण नव्या मोसमात गोव्याच्या क्रिकेटपटूंना कामगिरी उंचावण्यासाठी खूपच घाम गाळावा लागेल, हे त्यांची इतर संघाविरुद्धची अगोदरची कामगिरी पाहता जाणवते.

कोरोना विषाणू महामारीमुळे लॉकडाऊन असल्याने खेळाडू मैदानापासून दूर आहेत. कोविड-१९ वर अंकुश आल्यानंतर केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतरच सराव शिबिरे, स्पर्धा आदींना प्रारंभ होईल. रणजी क्रिकेट स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबरपासून खेळली जाऊ शकते.

गतमोसमातील कामगिरीच्या आधारे रणजी करंडक स्पर्धेत कोणते संघ कोणत्या गटात असतील हे स्पष्ट आहे.  त्यानुसार २०१९-२० मोसमात प्लेट गटात अव्वल राहिलेल्या गोव्याला पुन्हा एलिट गटात खेळायला मिळणार असून त्यांचा क गटात समावेश आहे. एलिटमधील संयुक्त अ-ब गटात तळात राहिलेल्या केरळ व हैदराबाद यांची क गटात पदावनती असेल. हे दोन्ही संघ गोव्याचे दक्षिण विभागातील पूर्वीचे प्रतिस्पर्धी आहेत. याशिवाय हरियाना, सेनादल, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड, आसाम व त्रिपुरा या संघाविरुद्ध गोवा यापूर्वी खेळला आहे.

``नव्या मोसमातील रणजी स्पर्धेत गोव्याच्या गटातील प्रतिस्पर्धी तगडे आहेत. गतमोसमातील प्लेट गटाच्या तुलनेत तुल्यबळ आणि खडतर आव्हान आहे. साहजिकच आम्हाला खूपच परिश्रम घेत तयारी करावी लागेल,`` असे काही दिवसांपूर्वी गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव विपुल फडके यांनी `गोमन्तक`ला सांगितले होते. नव्या मोसमातील रणजी स्पर्धेत प्रत्येक संघ एलिट गटातील स्थान राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्यामुळे १० संघांच्या क गटात प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण ठरेल. गटातील तळाच्या संघाची प्लेट गटात रवानगी होणार आहे. गोवा क्रिकेट असोसिएशनला सारी समीकरणे माहीत आहेत, हे सचिव विपुल यांच्या वक्तव्यावरून जाणवते.

 

आणखी एक पाहुणा खेळाडू?

गतमोसमात कर्नाटकचा अमित वर्मा आणि गुजरातचा स्मित पटेल हे गोव्याकडून पाहुणे (व्यावसायिक) खेळाडू या नात्याने खेळले होते. अमितने गोव्याचे नेतृत्वही केले होते. नव्या मोसमासाठीही त्यांचा करार कायम राखला जाण्याचे संकेत आहेत, तसेच आणखी एक पाहुणा खेळाडू करारबद्ध करण्यासाठी गोवा क्रिकेट संघटना उत्सुक असल्याचे समजते. मोसमात तीन पाहुणे क्रिकेटपटू खेळविण्याची परवानगी असते. सूत्रांच्या माहितीनुसार, संघात समतोल साधण्यासाठी वेगवान गोलंदाजीत अनुभवी असलेल्या खेळाडूस प्राधान्य मिळू शकते. अमित हा फलंदाज व लेगस्पिनर असून स्मित यष्टिरक्षक-फलंदाज आहे.  त्यामुळे गोलंदाजाशी करार करून संघ बळकट करण्याचे जीसीएचे नियोजन संभवते.

 

नव्या मोसमातील गोव्याचे प्रतिस्पर्धी

विरुद्ध सामने विजय पराभव अनिर्णित

केरळ २५ २ ११ १२

हैदराबाद २३ ० १५ ८

त्रिपुरा ११ २ २ ७

झारखंड ९ २ ३ ४

सेनादल ९ ० १ ८

आसाम ७ १ ३ ३

हरियाना ५ १ ३ १

महाराष्ट्र ३ ० १ २

छत्तीसगड २ १ ० १

 

संबंधित बातम्या