नव्या मार्गदर्शनाखाली बंगळूरची कसोटी

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

संघाच्या तत्त्वज्ञानाशी फारकत घेतल्याचे कारण देत बंगळूर एफसीने स्पॅनिश प्रशिक्षक कार्ल्स कुआद्रात यांना निरोप दिला.

पणजी: संघाच्या तत्त्वज्ञानाशी फारकत घेतल्याचे कारण देत बंगळूर एफसीने स्पॅनिश प्रशिक्षक कार्ल्स कुआद्रात यांना निरोप दिला. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमातील बाकी मोहिमेत आता माजी विजेता संघ नव्या मार्गदर्शनाखाली खेळेल, मात्र त्यांची कसोटी लागणार हे निश्चित. मागील काही सामन्यात खूपच प्रगती साधलेल्या ईस्ट बंगालचे त्यांच्यासमोर खडतर आव्हान आहे.

बंगळूर आणि ईस्ट बंगाल यांच्यातील सामना शनिवारी (ता. 9) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. बंगळूरला स्पर्धेतील नवव्या सामन्यात मुंबई सिटीकडून 1-3 फरकाने दारुण हार पत्करावी लागली. त्यांचा हा स्पर्धेतील एकंदरीत सलग तिसरा पराभव ठरला. बंगळूरवर स्पर्धेत अशी नामुष्की प्रथमच आली. त्यानंतर बंगळूर एफसी व्यवस्थापनाने कुआद्रात यांना सामंजस्याने पद सोडण्यास सांगितले. मागील चार मोसम बंगळूरच्या सपोर्ट स्टाफमध्ये असलेले नौशाद मूसा आता संघाचे अंतरिम प्रशिक्षक असतील. ईस्ट बंगालविरुद्ध त्यांचा पहिला सामना असेल. बंगळूरने तीन विजय आणि तेवढ्याच बरोबरीसह 12 गुणांची कमाई केली असून ते पाचव्या क्रमांकावर आहेत. मोसमातील बंगळूर कामगिरी निराशाजनक मानली जाते, विशेषतः बचावफळीत खूपच त्रुटी आहेत. त्यामुळेच त्यांना 12 गोल स्वीकारावे लागले आहेत. आक्रमणातही सुसूत्रता नसून सुनील छेत्रीवर हा संघ खूप विसंबून असल्याचे दिसून येते. बंगळूरला खेळाडूंच्या दुखापतींनीही सतावले आहे.

कोलकात्याच्या ईस्ट बंगालने स्पर्धेतील पदार्पणानंतर सुरवातीच्या सलग तीन पराभवानंतर खेळात चांगलीच सुधारणा केलेली आहे. मागील चार सामने ते अपराजित आहेत. त्यात तीन बरोबरी व एका विजयाचा समावेश आहे. नायजेरियाच्या ब्राईट एनोबाखारे याच्या समावेशानंतर ईस्ट बंगालचे आक्रमण जास्त धारदार झालेले आहे. एफसी गोवाविरुद्धच्या लढतीत एक खेळाडू झाल्यानंतरही ईस्ट बंगालने आघाडी घेतली, मात्र नंतर त्यांना बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले. ईस्ट बंगाल सध्या सात गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे.  या सूर गवसलेल्या संघाविरुद्ध बंगळूरला उद्या सावधच राहावे लागेल.

फावलरविना मैदानात...

ईस्ट बंगालचा संघ शनिवारी मुख्य प्रशिक्षक रॉबी फावलर यांच्याविना मैदानात उतरणार आहे. एफसी गोवाविरुद्ध त्यांना मोसमातील दुसरे यलो कार्ड मिळाले. निलंबनामुळे ते प्रशिक्षक या नात्याने संघाला बंगळूरविरुद्ध मार्गदर्शन करू शकणार नाहीत. एफसी गोवाविरुद्ध रेड कार्ड मिळाल्यामुळे ईस्ट बंगालला हुकमी बचावपटू कर्णधार डॅनियल फॉक्स याला मुकावे लागेल.

आणखी वाचा:

मॉरिसियोच्या धडाक्यासह ओडिशाचा पहिला विजयी जल्लोष ; केरळा ब्लास्टर्सला 4-2 फरकाने केलं पराभूत -

 

दृष्टिक्षेपात...

  • - बंगळूर एफसीचे 12 गोल, पण 12 गोल स्वीकारले
  • - ईस्ट बंगालचे 9 गोल, तर 15 गोल स्वीकारले
  • - ईस्ट बंगालच्या जॅक मघोमा याचे 3 गोल
  • - बंगळूरचा अनुभवी सुनील छेत्रीचे 4 गोल
  • - बंगळूरचा मागील 3 लढतीत फक्त 1 गोल
  • - अगोदरच्या 3 सामन्यात ईस्ट बंगालचे 6 गोल
     

संबंधित बातम्या