आय-लीग विजेतेपदासाठी तिरंगी चुरस; गोकुळम केरळा, ट्राऊ, चर्चिल ब्रदर्स संघ शर्यतीत

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मार्च 2021

गोकुळम केरळा व ट्राऊ यांच्यातील सामना शनिवारी कोलकाता येथील किशोर भारती क्रीडांगणावर खेळला जाईल.

पणजी: आय-लीग फुटबॉल विजेतेपदासाठी तिरंगी चुरस असून यंदाचा विजेता शनिवारी शेवटच्या दोन लढतीनंतर निश्चित होईल. करंडक पटकावण्याच्या शर्यतीत गोकुळम केरळा, मणिपूरचा टिड्डिम रोड ॲथलेटिक युनियन (ट्राऊ) आणि गोव्याचा चर्चिल ब्रदर्स या संघात चढाओढ आहे. ताजी कामगिरी पाहता, केरळच्या संघाला जेतेपदाची जास्त संधी असेल.

गोकुळम केरळा व ट्राऊ यांच्यातील सामना शनिवारी कोलकाता येथील किशोर भारती क्रीडांगणावर खेळला जाईल. या सामन्याकडे यंदाच्या आय-लीगचा अंतिम सामना या नजरेने पाहिले जात आहे. चर्चिल ब्रदर्स व पंजाब एफसी यांच्यातील सामना कोलकात्यातच विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर होईल. सध्या गोकुळम केरळा, ट्राऊ व चर्चिल ब्रदर्स या तिन्ही संघांचे समान 26 गुण आहेत, तर विजेतेपदाची संधी नसलेल्या पंजाब एफसीचे 22 गुण आहेत. (Tri Churas for I League championship Gokulam Kerala Trau Churchill Brothers in the team race)

डेस्मनच्या गोलमुळे धेंपो क्लब विजयी; प्रोफेशनल लीग फुटबॉलमध्ये वास्कोवर निसटती...

गोकुळम केरळाने अखेरच्या लढतीत विजय मिळविला आणि चर्चिल ब्रदर्सनेही सामना जिंकला, तर दोन्ही संघांचे समान 29 गुण होतील. अशा परिस्थितीत हेड-टू-हेड कामगिरी सरस असल्याने गोकुळम केरळास प्रथमच आय-लीग स्पर्धा जिंकता येईल. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात चर्चिल ब्रदर्सने 3-2 असा विजय मिळविला, तर गोकुळम केरळाने दुसऱ्या टप्प्यात 3-0 फरकाने बाजी मारली. सध्या गोलफरकात केरळचा संघ 5-3 असा सरस आहे. गोकुळम केरळा आणि ट्राऊ यांच्यातील सामना बरोबरीत राहिला आणि चर्चिल ब्रदर्सने पंजाब एफसीला हरविल्यास गोव्यातील संघ तिसऱ्यांदा आय-लीग विजेता ठरेल.

शनिवारच्या दोन्ही लढती बरोबरीत राहिल्यास गोकुळम केरळा, ट्राऊ व चर्चिल ब्रदर्सचे समान 27 गुण होतील आणि या परिस्थितीतही गोकुळम केरळाचे पारडे जड ठरेल. त्यांनी ट्राऊ संघाला पहिल्या टप्प्यात 3-1 फरकाने हरविले होते. शेवटच्या सामन्यात पंजाब एफसीने चर्चिल ब्रदर्सला हरविल्यास गोकुळम केरळास विजेतेपदासाठी ट्राऊ संघाविरुद्ध बरोबरी पुरेशी ठरेल. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी गोव्यातील संघ पराभूत झाला आणि  ट्राऊ संघाने गोकुळम केरळास हरविले, तर मणिपूरमधील इंफाळचा संघ प्रथमच आय-लीग विजेता ठरेल.

सध्या गोकुळम केरळा व ट्राऊ संघाचा गोलफरक समान +11, तर चर्चिल ब्रदर्सचा गोलफरक +4 आहे. अखेरच्या लढतीत ट्राऊ व चर्चिल ब्रदर्सने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्यास त्यांचे समान 29 गुण होतील. स्पर्धेतील अगोदरच्या दोन्ही लढतीत चर्चिल ब्रदर्स व ट्राऊ यांच्यात 1-1 गोलबरोबरी झाली होती. स्पर्धेतील एकंदरीत गोलफरकात ट्राऊ संघ वरचढ आहे. चर्चिल ब्रदर्स व ट्राऊ संघाचे गुण आणि गोलफरकही समान झाल्यास स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदविणारा संघ विजेता बनेल. सध्या गोकुळम केरळाने 27, ट्राऊ संघाने 26, तर चर्चिल ब्रदर्सने 19 गोल नोंदविले आहेत.
 

संबंधित बातम्या